नागरी सुविधांपासून नागरिक वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:45+5:302021-03-21T04:16:45+5:30
बाजारपेठेतील गर्दी हटेना परभणी : कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने सायंकाळची संचारबंदी लागू केली आहे. मात्र, सायंकाळी सात वाजेपर्यंत ...
बाजारपेठेतील गर्दी हटेना
परभणी : कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने सायंकाळची संचारबंदी लागू केली आहे. मात्र, सायंकाळी सात वाजेपर्यंत शहरात बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत असून, मनपा प्रशासनाच्या पथकांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
जिल्हा स्टेडियमवरील स्वच्छतागृह बंद
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरात खेळाडूंसाठी उभारण्यात आलेले स्वच्छतागृह बंद आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे देखभाल, दुरुस्तीअभावी स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे खेळाडूंची कुचंबणा होत आहे.
लघु विक्रेत्यांची फरपट
परभणी : जिल्ह्यातील आठवडी बाजार मागील चार आठवड्यांपासून बंद असल्याने लघू विक्रेत्यांची फरपट होत आहे. आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मात्र, ही उलाढाल आता थांबली आहे. आठवडी बाजारातून होणाऱ्या उत्पन्नावर व्यावसायिकांना पाणी सोडावे लागत आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला उत्पादक शेतकरीही अडचणीत आले आहेत.
रस्त्याच्या कडेने खोदकाम
परभणी : येथील वसंतराव नाईक यांचा पुतळा ते सुपर मार्केट या रस्त्याच्या कडेने खोदकाम केले जात आहे. महानगरपालिकेचे जलवाहिनी टाकण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. सध्या सुपर मार्केट परिसरामध्ये खोदकाम सुरू असून, नवीन जलकुंभाला जलवाहिनी जोडली जाणार आहे.
वाहनधारकांनी निवडला पर्यायी मार्ग
परभणी : परभणी ते मानवत रोड या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने वाहनधारक त्रस्त असून, पाथरी येथे जाण्यासाठी आता पर्यायी मार्गाची निवड करण्यात आली आहे. गंगाखेड रोडवरील उमरी फाट्यावरून नागरिक पाथरी येथे जाणे पसंत करीत आहेत. विशेष म्हणजे हा मार्ग दूर अंतराचा असतानाही बहुतांश वाहनधारक पाथरी येथे जाण्यासाठी हाच पर्यायी मार्ग निवडत आहेत.
पाण्याअभावी वाळू लागली झाडे
परभणी : मागील वर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण केलेली अनेक झाडे पाण्याअभावी वाळत आहेत. प्रशासनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण तर केले; मात्र या झाडांसाठी पाण्याची सुविधा केली नाही. आतापर्यंत भूजल पातळी वाढलेली असल्याने झाडे तग धरून राहिली. मात्र, आता झाडांना पाणी कमी पडू लागले असून, ही झाडे वाळत आहेत.
‘नटराज’ची दुरुस्ती रखडली
परभणी : शहरातील नाट्यगृहाची दुरवस्था झाल्याने हे नाट्यगृह मागच्या पाच वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहे. मनपाने नाट्यगृहाची दुरुस्ती करून ते वापरात आणावे, अशी कलावंतांची मागणी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मध्यंतरी दुरुस्तीचा ठराव पाठविण्यासाठी हालचाली करण्यात आल्या. सध्या मात्र दुरुस्तीसाठी फारसे प्रयत्न होत नसल्याने कलावंतांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरात विविध भागांत शीतपेयगृह सुरू
परभणी : शहरातील विविध भागांमध्ये शीतपेयगृह सुरू करण्यात आली आहेत. मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून, व्यावसायिकांनी शीतपेयगृह सुरू केली आहेत. मात्र, ग्राहक अजूनही शीतपेयगृहांकडे फिरकले नाहीत. आइस्क्रीम व कोल्ड्रिंक्सला मागणी वाढत आहे.