परभणी शहरात ‘वन-वे’ नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:48 AM2021-02-20T04:48:39+5:302021-02-20T04:48:39+5:30

परभणी : वाहतुकीची वर्दळ अधिक असणारे शहरातील काही रस्ते वन-वे केले असतानाही त्यावरून दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा सुरू ...

In the city of Parbhani, it is called 'One-Way' | परभणी शहरात ‘वन-वे’ नावालाच

परभणी शहरात ‘वन-वे’ नावालाच

googlenewsNext

परभणी : वाहतुकीची वर्दळ अधिक असणारे शहरातील काही रस्ते वन-वे केले असतानाही त्यावरून दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा सुरू असल्याने सातत्याने वाहतूक खोळंबत असल्याचा प्रकार पहावयास मिळत आहे.

परभणी शहरातील स्टेशनरोड, अष्टभूजा देवी मंदिर चौक, गांधी पार्क, शिवाजी चौक, नानलपेठ कॉर्नर, वसमतरोड, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा जोतिबा फुले चौक या दरम्यानच्या रस्त्यांवर वाहनांची अधिक वर्दळ असल्याने सुरळीत वाहतुकीसाठी ते वन-वे करण्यात आले आहेत. असे असताना गेल्या महिन्यांपासून या संदर्भातील नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने विरुद्ध दिशेने सातत्याने वाहनधारक ये-जा करीत आहेत. परिणामी वाहतुकीवर परिणाम होत आहे.

वसमत रस्त्यावर विरुद्ध दिशेने ये-जा

शहरातील वसमत रस्ता हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. असे असताना शिवशक्ती बिल्डिंग परिसरातील रस्त्यावरून विरुद्ध दिशेने सर्रास वाहनधारक ये-जा करीत आहेत. याशिवाय काळी कमान परिसरातही रस्त्याच्या बाजूला असलेली भाजीखरेदी करण्यासाठीही विरुद्ध मार्गाचा अवलंब करून वाहनधारक रहदारी करीत असतात.

जिल्हा बँकेसमोरील रस्त्यावरही अशीच स्थिती

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यासमोरील रस्ता हा पूर्णत: वन-वे असताना या बँकेतून येणारे वाहनधारक थेट विरुद्ध दिशेने महात्मा फुले चौकाकडे येतात. अशा वेळी या चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराच्या दिशेने जाणारे वाहनधारकही जात असल्याने अनेक वेळा किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत.

नारायण चाळ भागातही कोंडी

शहरातील बाजारपेठेत जाण्यासाठी असलेल्या नारायण चाळ भागात एकेकाळी वन-वे रस्ता होता. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत राहत होती. आता मात्र या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनधारक ये-जा करीत असल्याने सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच नारायण चाळ ते महात्मा जोतिबा फुले चौक यादरम्याच्या अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

वाहतूक पोलिसांची नियुक्ती गरजेची

शहरात ज्या ठिकाणी वन-वे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्या प्रत्येक रस्त्यांवर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वी नारायण चाळ, गांधी पार्क, शिवाजी चौक, काळी कमान आदी भागांत पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत होती. आता मात्र या भागात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दिसत नाहीत. त्यामुळे वाहनधारक सर्रासपणे विरुद्ध दिशेने वाहने चालवितात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी व किरकोळ अपघाताचे प्रकार होत आहेत. शहर वाहतूक शाखेने ही बाब गांभीर्याने घेऊन वन-वेच्या नियमांचे शहामध्ये तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

Web Title: In the city of Parbhani, it is called 'One-Way'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.