थाळ्या वाजवल्या, अर्धेनग्नही झाले; साहेब तुम्हीच सांगा रस्त्यासाठी आणखी काय करायचे

By मारोती जुंबडे | Published: September 27, 2022 07:27 PM2022-09-27T19:27:52+5:302022-09-27T19:28:08+5:30

गावही काढले विक्रीला, केवळ रस्ता करून देण्याची मागणी

clapped, even became half-naked; Sir, tell me what else to do for the road | थाळ्या वाजवल्या, अर्धेनग्नही झाले; साहेब तुम्हीच सांगा रस्त्यासाठी आणखी काय करायचे

थाळ्या वाजवल्या, अर्धेनग्नही झाले; साहेब तुम्हीच सांगा रस्त्यासाठी आणखी काय करायचे

Next

परभणी : पूर्णा तालुक्यातील माहेर पाटीपासून ते गावापर्यंतचा तीन किमी रस्ता तयार करून देण्यासाठी ग्रामस्थांकडून २३ सप्टेंबर रोजी गाव विक्रीला काढले. मात्र गावात येणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर चिखल असल्याने इतर गावातील बोलीदारही गावात आले नाहीत. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ग्रामस्थांनी रस्त्यावरील चिखलात उभे राहून थाळ्या वाजवून तर मंगळवारी अर्धेनग्न होत आंदोलन केले. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे साहेब तुम्हीच सांगा हो, आम्ही अजुन काय? करायचे असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. 

वर्षभरापुर्वी  पूर्णा तालुक्यातील माहेर पाटीपासून ते गावापर्यंतचा ३ कि.मी.पर्यंतचा रस्ता तयार करण्यात यावा, या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांना जिल्हाधिकारी व गावास भेट देण्यास आलेले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिले. त्यानंतर या रस्त्यावर कच्चे खडक टाकण्यात आले. मात्र रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत बानेगाव थांबा ते माहेर ३ किमी रस्त्यावर ८ महिने २-३ फूट चिखल राहतो. या चिखलातून ग्रामस्थांना तालुका, जिल्ह्याचे ठिकाणी गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तसेच गरोदर मातांना, रुग्णांना, वृध्दांना रुग्णालयात नेणे अवघड झाले आहे. मागील वर्षी शालेय पोषण आहाराचा ट्रक रस्त्याअभावी परत गेल्याने सर्व तालुक्यासह जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या फौजफाट्याने गाव गाठले. 

विशेष म्हणजे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना आपल्या गाड्या सोडून पायीच गाव गाठावे लागले होते. त्यावेळी लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावू, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या घटनेला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही अद्याप गावकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न मिटला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २५ सप्टेंबरपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर गाव, घर, शेतीवाडीही बोलीव्दारे विक्रीस काढणार आहोत, अशा आशयाचे निवेदन २२ सप्टेंबर रोजी तहसीलदार पल्लवी टेमकर यांना देण्यात आले. त्यानंतर तरी प्रशासन तातडीने पावले उचलत रस्ता दुरुस्ती बाबत निर्णय घेईल असे वाटत होते. मात्र तसे काहीही झाले नाही. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ग्रामस्थांनी रस्त्यावरील चिखलात उभे राहून थाळ्या वाजवून तर मंगळवारी अर्धेनग्न होत आंदोलन केले. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आली नाही. 

१६ वर्षांपूर्वी रस्त्याचे माती काम
पूर्णा तालुक्यातील माहेर  हे गाव ताडकळस ते पालम राज्य रस्त्यावर पश्चिमेस साडेतीन कि. मी. अंतरावर आहे; मात्र या गावाला इतर गावाशी, मुख्यालयाशी तालुका व जिल्हा जोडणारा दळणवळणासाठीचा पक्का रस्ता नाही. १६ वर्षांपूर्वी म्हणजेच २००५ मध्ये जिल्हा परिषदेच्यावतीने या रस्त्याचे खोदकाम व मातीकाम करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

प्रशासन, लोकप्रतिनिधी पुढे येईनात
माहेर ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी गाव विक्रीला काढले. ही बातमी वाऱ्यासारखी राज्यभर पसरली. मात्र तरीही जिल्हा भरातील एकही आधिकारी, लोकप्रतिनिधी या गावात पोहचून ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. हे मात्र खरोखरच विषेश आहे.

Web Title: clapped, even became half-naked; Sir, tell me what else to do for the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.