बारावी निकाल : परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात चौथ्या स्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 03:59 PM2019-05-28T15:59:04+5:302019-05-28T16:00:51+5:30
जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९१़७२ टक्के लागला आहे़
परभणी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, परभणी जिल्ह्याचा निकाल ८४़५१ टक्के लागला आहे़ औरंगाबाद विभागात परभणी जिल्हा चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे़ विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेतही यावर्षी निकालात घसरण झाल्याचे स्पष्ट होत आहे़
बारावी परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातून २३ हजार ५४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती़ त्यापैकी २३ हजार ५१६ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले़ परीक्षाअंती घोषित झालेल्या निकालानुसार १४११ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत़९ हजार १६३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९ हजार १२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २८७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले़ एकूण १९ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेचे हे प्रमाण ८४़५१ टक्के एवढे आहे़
जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९१़७२ टक्के लागला आहे़ वाणिज्य शाखेचा ९०़९७ टक्के, कला शाखेचा ७६़७४ टक्के तर व्यवसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ७३़६४ टक्के लागला आहे़ औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, त्या खालोखाल बीड, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा निकाल लागला आहे़