स्वच्छ सर्वेक्षणात गंगाखेड पालिका देशात ५२ व्या स्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 06:44 PM2019-03-06T18:44:53+5:302019-03-06T18:45:17+5:30
केंद्र शासनाने देशभरात नागरी भागासाठी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविले आहे़
परभणी- केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये जिल्ह्यातील गंगाखेड नगरपालिकेने ३२२९़४४ गुण घेऊन देश पातळीवर ५२ वे स्थान पटकावले आहे़
केंद्र शासनाने देशभरात नागरी भागासाठी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविले आहे़ ४ ते ३० जानेवारी या काळात केंद्रस्तराच्या पथकांनी शहरांना भेटी देऊन या अभियानातील कामांची पाहणी करीत गुणांकन केले होते़ बुधवारी दिल्ली येथे देशातील शहरांचे गुणांकन जाहीर करण्यात आले आहे़ त्यामध्ये चार विभागांत हे गुणांकन जाहीर केले असून, पश्चिम विभागामधून परभणी जिल्ह्यातून गंगाखेड नगरपालिकेने ५२ वा क्रमांक मिळविला आहे
याशिवाय जिल्ह्यातील सेलू नगरपालिकेने ३१८७़२० गुण घेऊन ६२ वा, पाथरी नगरपालिकेने ३०८६़९५ गुण घेऊन ८२ वा क्रमांक मिळविला आहे़ तर जिंतूर नगरपालिका २८७८़७९ गुण घेऊन १४६ व्या क्रमांकावर आहे़ मानवत नगरपालिका २७२७़५९ गुणांसह २२४ व्या, पालम नगरपंचायत २५०४़४८ गुणांसह ३४६ व्या, पूर्णा नगरपालिका २४५८़८९ गुणांसह ३६९ व्या आणि सोनपेठ नगरपालिका विभागात ४३३ क्रमांकावर आहे़ या नगरपालिकेला २३४९़१० गुण मिळाले आहेत़
पश्चिम विभागातून हा रँक जाहीर करण्यात आला असून, या विभागात राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या पाच राज्यांचा समावेश आहे़ स्वच्छ सर्वेक्षण अभियानात प्रथम येणाऱ्या २५ नगरपालिकांना १५ कोटी, २५ ते ५० या रँकमधील नगरपालिकांना १० कोटी तर ५० ते १०० रँकमधील नगरपालिकांना ५ कोटी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त होते़ परभणी जिल्ह्यातील गंगाखेडसह सेलू आणि पाथरी या दोन्ही पालिका ५ कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानास पात्र ठरल्या आहेत़