चौकीदार पदाच्या अनुकंपा प्रस्तावासाठी घेतली लाच, लिपिक रंगेहाथ अटकेत
By राजन मगरुळकर | Published: November 1, 2022 06:54 PM2022-11-01T18:54:37+5:302022-11-01T18:55:15+5:30
मागणी केलेल्या दोन हजार रुपयांच्या रकमेपैकी एक हजार रुपयांची लाच स्वीकारली.
परभणी : वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावरील कालवा चौकीदार वर्ग चार पदाच्या नोकरीसाठीचा प्रस्ताव औरंगाबाद येथे पाठविण्यासाठी जलसंपदा विभागातील लिपिक कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केली. यामध्ये एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना या लिपिकास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या परभणी पथकाने मंगळवारी दुपारी केली.
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोनच्या जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेले प्रल्हाद संभाजी गिरी यांनी ही लाच स्वीकारली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये तक्रारदाराचे मयत वडील यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावरील कालवा चौकीदार वर्ग चार नोकरीसाठीचा प्रस्ताव औरंगाबाद येथे पाठवून घेण्यासाठी नमूद आरोपी लोकसेवक प्रल्हाद गिरी यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी शासकीय पंचासमक्ष तक्रारदाराकडे केली.
मागणी केलेल्या दोन हजार रुपयांच्या रकमेपैकी प्रल्हाद गिरी यांनी एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. यावेळी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. आरोपी लोकसेवकास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी नवा मोंढा ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे, पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे, पोलीस कर्मचारी कटारे, निलपत्रेवार, कदम यांनी केली.