पाथरीत पुरवठा विभागाचा अव्वल कारकून लाच घेताना जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 07:12 PM2018-03-16T19:12:05+5:302018-03-16T19:12:34+5:30
वडिलांच्या वडिलांच्या नावे असलेले रेशन कार्ड विभक्त करून देण्यासाठी २८०० रुपयाची लाच मागणाऱ्या कारकुनास लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.
पाथरी (परभणी ) : वडिलांच्या वडिलांच्या नावे असलेले रेशन कार्ड विभक्त करून देण्यासाठी २८०० रुपयाची लाच मागणाऱ्या कारकुनास लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. भरत घनसावध असे अटक करण्यात आलेल्या कारकुनाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रेणापूर येथील तक्रारदाराने वडिलांच्या नावे असलेले रेशन कार्ड तीन भावाच्या नावे विभक्त करू देण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात दोन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती. मात्र या कामासाठी अव्वल कारकून भरत घनसावध याने ३ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदाराने परभणी येथील लाच लुचपत विभागाकडे लेखी तक्रार नोंदवली. यानुसार आज कार्यालयात सापळा रचण्यात आला व तक्रारदाराकडून २८०० रुपयाची लाच स्वीकारत असताना घनसावध याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक एन. ए. बेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक भारती व अनिल गव्हाणकर, पो हे लक्ष्मण मुरकुटे, अनिल कटारे, माणिकराव चटे यांनी केली.