बंद जि. प. शाळांत साप, विंचवांचा धोका; झाडे-झुडपेही वाढली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:23 AM2021-09-16T04:23:52+5:302021-09-16T04:23:52+5:30
परभणी : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असल्याने या शाळांच्या परिसरात झाडे-झुडपे व ...
परभणी : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असल्याने या शाळांच्या परिसरात झाडे-झुडपे व गवत वाढले आहे. त्यामुळे या परिसरात साप, विंचवांचा धोका निर्माण झाला आहे.
कोरोनामुळे २० मार्च २०२० पासून जिल्ह्यातील पहिली ते पाचवीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत. गेल्यावर्षी सहावीच्या पुढील वर्गाच्या शाळा काही कालावधीसाठी भरल्या होत्या; परंतु नंतर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्या बंद करण्यात आल्या. चालू शैक्षणिक वर्षात तर अद्याप पहिली ते पाचवीच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत. जिल्ह्यात सहावीच्या पुढील वर्गाच्या शाळा काही ठिकाणी सुरू झाल्या आहेत. परंतु, बहुतांश ठिकाणच्या शाळा बंद असल्याने या शाळांचा परिसर ओसाड पडला आहे. शाळा परिसरात सध्या झाडे-झुडपे वाढली असून, या भागात गवत वाढल्याने साप, विंचवांचा धोका वाढला आहे. त्यामुळे या शाळांच्या दुरुस्तीकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
वर्गखोल्यांमधील धूळ हटेना
जिल्ह्यातील शाळा गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे.
शिवाय चालू वर्षी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने विविध शाळांमधील काही वर्गखोल्यांना गळती लागल्याने या वर्गखोल्यांत कुबट वास येत आहे.
निधीअभावी मुख्याध्यापकांची अडचण
शाळांच्या परिसराची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांकडे निधीची उपलब्धता नाही.
त्यामुळे किरकोळ स्वच्छतेची कामे कशी करावीत, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. काही मुख्याध्यापकांनी स्वखर्चातून ही कामे केली आहेत.
पालक म्हणतात...
परिश्रम घेऊनही शेतात पीक उगवत नाही; पण कसलीही देखभाल किंवा संवर्धन केले नसतानाही शाळा परिसरात गवत वाढत आहे. त्याकडे शाळा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे.
- उद्धवराव आघाव, बोरकीनी, ता. सेलू
शाळा परिसरात वाढलेले गवत विषारी असल्याने ते मोडण्यासाठी दरवर्षीचीच डोकेदुखी असते. तणनाशक फवारणी वेळेवर केली तर सुरक्षितता होऊ शकते.
- पांडुरंग मुसळे, बोरकीनी, ता. सेलू
जि. प. शाळांच्या मुख्याध्यापकांनी लोकसहभागातून किंवा ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करून वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून स्वच्छतेची कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जि. प. शाळांच्या मुख्याध्यापकांनी लोकसहभागातून किंवा ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करून वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून स्वच्छतेची कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिक्षकांची उपस्थिती किती?
जिल्हा परिषदेच्या पहिली ते पाचवीच्या अनेक ठिकाणच्या शाळा सुरू नसल्या तरी संबंधित शाळेतील शिक्षक शाळेत हजेरी लावतात. ऑनलाईन वर्ग घेतात; परंतु काहीजण दांडी मारतात.