ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:23 AM2021-09-09T04:23:08+5:302021-09-09T04:23:08+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क परभणी : ढगाळ वातावरण विषाणूंसाठी पोषक असल्याने या काळात साथरोग बळावतात. याच काळात अस्थमाच्या रुग्णांनाही श्वसनाचे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ढगाळ वातावरण विषाणूंसाठी पोषक असल्याने या काळात साथरोग बळावतात. याच काळात अस्थमाच्या रुग्णांनाही श्वसनाचे त्रास वाढतात तसेच या रुग्णांमध्ये सर्दी-खोकला बऱ्याच काळापर्यंत राहतो. त्यामुळे अस्थामाच्या रुग्णांनी या काळात स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
या घटकांपासून राहावे दूर
अस्थमाच्या रुग्णांना काही घटकांपासून नेहमीच त्रास होतो. त्याला ट्रीगर्स असे म्हणतात. त्यात ढगाळ वातावरणाबरोबरच धूळ, उदबत्तीचा वास, फुलांचा वास, थंड हवा यामुळे दम्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा घटकांपासून रुग्णांनी दूर राहावे.
बालकांमध्ये अस्थमा
अलीकडच्या काळात बालकांमध्येही अस्थमाच्या समस्या अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. एखाद्या विषाणूचा वारंवार संसर्ग झाल्यास हा त्रास उद्भवतो. अशावेळी मुलांसाठी काही लसी उपलब्ध आहेत. त्या घेतल्या पाहिजेत.
ही घ्या काळजी
अस्थमाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. अस्थमासाठी इन्फेक्ट करणारे घटक शोधून त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्यास हे रुग्ण सर्वसाधारण नागरिकांप्रमाणे राहू शकतात.
ढगाळ वातावरण हे विषाणूंसाठी पोषक असल्याने अनेक संसर्गजन्य आजार या काळात बळावतात. त्यात श्वसनाचा त्रासदेखील वाढतो. त्यामुळे या रुग्णांनी काळजी घ्यायला हवी. अस्थमा असलेल्या व्यक्तींचे पांघरुण दर पंधरा दिवसांनी उकळत्या पाण्यात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
- डॉ. रुपेश नगराळे, हृदयरोग तज्ज्ञ