शीत शवपेटी, क्ष- किरण यंत्र धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 AM2020-12-15T04:33:42+5:302020-12-15T04:33:42+5:30
ग्रामीण रुग्णालयातील क्षकिरण विभाग कायम बंद असल्याचे दिसून येत आहे. हा विभाग बंद असल्यामुळे गोरगरीब रुग्णांना ४०० रुपये खर्च ...
ग्रामीण रुग्णालयातील क्षकिरण विभाग कायम बंद असल्याचे दिसून येत आहे. हा विभाग बंद असल्यामुळे गोरगरीब रुग्णांना ४०० रुपये खर्च करून खाजगी रुग्णालयातून एक्स-रे काढावे लागत आहेत. रुग्णालयात जन्म घेतलेल्या नवजात शिशूंसाठी वार्मिंग मशीन आहे. परंतु, ती अद्याप सुरूच करण्यात आली नाही. ही मशीन सुरू झाली तर बालरोग तज्ज्ञांना ड्युटीवर थांबावे लागते. त्यामुळे ही मशीन अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी गोरगरीब रुग्णांना ३ ते ४ हजार रुपये प्रतीदिन खरेदी करून खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागतो. रुग्णालयास दोन मृतदेह ठेवण्याची व्यवस्था असणारी शीत शवपेटी मिळाली आहे. मात्र मागील चार वर्षापासून ही पेटी रुग्णालयाच्या पाठीमागे धूळखात पडून आहे. अद्यापही या पेटीची रुग्णालयात स्थापना करण्यात आलेली नाही. आता ती उपयोगात येईल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ३ वर्षापूर्वी रक्त संकलन केंद्रासाठीची यंत्रसामुग्री रुग्णालयात येऊन पडली होती. परंतु, अन्य व औषधी प्रशासनाच्या त्रुटी पूर्ण करण्याअभावी हे काम प्रलंबित आहे. या बाबतीत कोणताच पाठपुरावा ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी संपर्क साधल्यास पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत वेळ मारून नेली जात आहे. ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लाखो रुपयांची यंत्रसामुग्री धूळखात पडून आहे. या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांनी लक्ष घालून एक्स-रेसाठी इतर यंत्रसामुग्रीचा वापर करून रुग्णांना सुविधा मिळवून देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला कडक सूचना द्याव्यात, अशी मागणी रुग्णांमधून होत आहे.
बायोमॅट्रिक मशीन नावालाच...
आरोग्य उपसंचालकांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्याचे पगार बायोमॅट्रिक प्रणालीद्वारे काढण्याचे आदेश आहेत. मात्र या रुग्णालयात या बाबत कोणतीही कारवाई होत नाही. बायोमॅट्रिक मशीनचा वापर केल्यास कर्मचाऱ्यांना दररोज रुग्णालयात यावे लागेल. त्यामुळे आरोग्य उपसंचालकांच्या आदेशालाच हारताळ फासून वेतन सरळ रजिस्टवरून काढले जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणाचाच धाक राहिलेला नाही. दुसरीकडे महिना-महिना काही कर्मचारी गायब राहत असून, एकाच दिवशी ३० दिवसाच्या स्वाक्षऱ्या रजिस्टरवर करीत असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून कर्मचाऱ्यांचे वेतन काढले जात अ सल्याची माहिती आहे.