परभणी जिल्हा गारठाला; तापमान आले ३ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 03:55 PM2018-12-29T15:55:33+5:302018-12-29T15:58:51+5:30
जिल्ह्यात थंडीची लाट आली असून, शनिवारी तापमान ३ अंशापर्यंत खाली आले आहे.
परभणी- जिल्ह्यात थंडीची लाट आली असून, शनिवारी तापमान ३ अंशापर्यंत खाली आले आहे. पहाटेपासूनच कडाक्याच्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. शनिवारी वाढलेल्या थंडीमुळे सकाळी उशिरापर्यंत दैनंदिन कामाकाजालाही सुरुवात झाली नव्हती़ त्यामुळे या थंडीने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने शनिवारी किमान तापमान ३ अंश झाल्याची नोंद घेतली आहे़ यावर्षीच्या हिवाळ्यातील आणि जानेवारी ते डिसेंबर या काळातील निच्चांकी तापमान ठरले आहे़ शुक्रवारी रात्रीपासूनच थंडीला सुरुवात झाली़ रात्री वातावरणात चांगलाच गारठा वाढला होता़ त्यामुळे सायंकाळनंतर शहरातील रस्ते सुनसान झाल्याचे जानवत होते़ असह्य करणाऱ्या थंडीमुळे साथरोगांचाही फैलाव होत आहे़ घराघरात थंडी, तापीचे रुग्ण वाढले आहेत़ दोन दिवसांपासून थंडी वाढल्यान दिवसभर उबदार कपड्यांचा वापर केला जात आहे़
विदर्भाच्या पश्चिम भागामध्ये थंड वाऱ्याची लाट आहे़ या पश्चिम भागात परभणी, नांदेड आणि हिंगोली हे तीनही जिल्हे येत असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या तीन जिल्ह्यात तापमान घटले आहे़ तसेच उत्तर प्रदेशातील हिमवृष्टी परिणामही झाला आहे, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ केक़े़ डाखोरे यांनी सांगितले.