परभणीकर थंडीने हुडहुडले, सलग दुसऱ्या दिवशी परभणी ८.० अंश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 07:08 PM2022-11-22T19:08:56+5:302022-11-22T19:18:25+5:30
मराठवाड्यात १८ ते २४ व २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
परभणी : यंदा मागील वर्षीपेक्षा एक महिना आधीच किमान तापमान घटले आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ८ ते १० तारीख दरम्यान ८ अंश या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. यंदा सोमवारी परभणीचे किमान तापमान ८.० अंशाखाली आले आहे. रविवार तसेच सोमवारच्या घटलेल्या तापमानामुळे दोन दिवसांपासून थंडीची लाट कायम आहे.
परभणी शहरात यावर्षी हिवाळ्यात रविवारी सर्वात कमी तापमानाची नोंद झाल्याचे दिसून आले. किमान तापमान ८.३ अंशांखाली आल्याने परभणीकर थंडीने हुडहुडले. मात्र, दुसऱ्या दिवशी या तापमानात ०.३ अंशाची घट झाली. त्यामुळे सोमवारी किमान तापमान ८ अंश झाले होते. परिणामी, थंडीच्या प्रभावाने जनजीवन विस्कळीत झाले. दोन दिवसांत परभणीकरांना गारठा जाणवण्यास सुरुवात झाली. यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दिसून आले. सकाळच्या वेळी विद्यापीठ परिसर, उद्यानात येणाऱ्यांची वर्दळही रोडावली होती. या थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी उबदार कपड्यांचा पेहराव केल्याचे दिसून आले. थंडीमुळे सकाळी तसेच रात्री रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे दिसून येत आहे.
किमान तापमान वाढण्याची शक्यता
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या प्राप्त अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये १८ नोव्हेंबर रोजी दिलेल्या अंदाजानुसार दोन दिवसांत किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट होऊ शकते, असे कळविले होते. त्यानुसार घट झाल्याचे पाहावयास मिळाले. किमान तापमान २१ नोव्हेंबरपासून हळूहळू दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाड्यात १८ ते २४ व २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
असे होते सात दिवसांतील किमान तापमान
१५ नोव्हेंबर १२.०
१६ नोव्हेंबर १०.७
१७ नोव्हेंबर ११
१८ नोव्हेंबर १२.५
१९ नोव्हेंबर १०.१
२० नोव्हेंबर ८.३
२१ नोव्हेंबर ८.०