परभणी जिल्ह्यात थंडीची लाट; पारा ५.६ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:32 PM2020-12-21T12:32:13+5:302020-12-21T12:33:31+5:30
यापुढेही तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामान विभागाचे प्रमुख डॉ.के.के. डाखोरे यांनी वर्तविली.
परभणी : जिल्ह्यात थंडीची लाट पसरली असून, सोमवारी ५.६ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या हिवाळ्यातील हे नीचांकी तापमान ठरले आहे.दोन दिवसांपासून वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.
काश्मिरमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीचा परिणाम राज्याच्या वातावरणावर झाला असून, थंड वारे वाहू लागले आहेत. जिल्ह्यात या वर्षीच्या हिवाळ्यातील नीचांकी ५.६ अंश किमान तापमानाची नोंद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाने घेतली आहे. १९ डिसेंबर रोजी जिल्ह्यात १२.३ अंश तापमान नोंद झाले होते. त्यात मोठी घट झाली असून, रविवारी ७ अंश तर सोमवारी ५.६ अंश तापमान नोंद झाले. तापमानात घट झाल्याने जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले असून, दुपारी १२ वाजेपर्यंत वातावरणातील गारठा कायम आहे.
उन्हाच्या किरणांची तीव्रताही कमी झाली आहे. त्यात भर म्हणून थंड वारे वाहू लागले आहे. त्यामुळे झोंबणारी थंडी आता जाणवू लागली आहे. येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल आणि राजगोपालाचारी उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही घटली होती. यापुढेही तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामान विभागाचे प्रमुख डॉ.के.के. डाखोरे यांनी वर्तविली.