परभणी जिल्हा पुन्हा गारठला; तापमान आले ७.६ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 06:24 PM2019-02-09T18:24:58+5:302019-02-09T18:25:19+5:30
आज तापमान ७.६ अंशावर स्थिरावल्याची नोंद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने घेतली आहे.
परभणी : जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीची लाट पसरली आहे. आज जिल्ह्याचा पारा ७.६ अंशापर्यंत घसरला. त्यामुळे जिल्हावासीयांना सकाळपासूनच थंडीचा सामना करावा लागला.
फेब्रुवारी महिना उजाडला तरी थंडी परतण्याचे नाव घेत नाही.या आठवड्यात तर पारा दिवसेंदिवस घटत असल्याने असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या वर्षी थंडीचे प्रमाण मागील काही वर्षांच्या तुलनेत अधिक असल्याचेही जाणवत आहे. मागील आठवड्यामध्ये किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली होती मात्र दोन दिवसांपासून तापमानात पुन्हा घट होत आहे.
शनिवारी परभणी जिल्ह्याचे किमान तापमान ७.६ अंशावर स्थिरावल्याची नोंद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने घेतली आहे. शनिवारी पहाटेपासूनच वातावरणात गारठा निर्माण झाला होता. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम जिल्ह्याच्या तापमानावर झाला असून थंडीने नागरिक जेरीस आले आहेत. दरम्यान शनिवारी पहाटे थंड वाऱ्यामुळे मॉर्निंग वाकसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या घटल्याचे दिसून आले.