परभणी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून माहितीचे संकलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 11:25 AM2017-11-16T11:25:48+5:302017-11-16T11:30:44+5:30
कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबियांची प्रशासनातील अधिका-यांनी भेट घेऊन या कुटूंबियांची संपूर्ण माहिती बुधवारी एकत्रित केली.
परभणी : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबियांची प्रशासनातील अधिका-यांनी भेट घेऊन या कुटूंबियांची संपूर्ण माहिती बुधवारी एकत्रित केली़ शेतकरी कुटूंबियांचा उदरनिर्वाह कसा होतो, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला का? याची माहिती अधिका-यांनी घेतली़ विशेष म्हणजे या कुटूंबियांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत़
मागील दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले़ त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या़ अनेक शेतक-यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या़ या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना शासनाच्या वतीने एक लाख रुपयांची तातडीची मदत यापूर्वीच देण्यात आली आहे़ मात्र सध्या या कुटूंबियांचा उदरनिर्वाह कसा चालाते, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळतो की नाही? याची खातरजमा करण्यासाठी राज्यस्तरावरून प्रशासनाला आदेश देण्यात आले आणि या आदेशानुसार परभणी जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना भेट देण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी ग्रामीण भागात पोहचले़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची यादी तयार करून अधिकारी, कर्मचा-यांना गावनिहाय भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले़ त्यानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये महसूलचे कर्मचारी शेतकरी कुटूंबियांच्या घरी पोहचले़
या कुटूंबियांची आस्थेवाईक चौकशी करीत प्राप्त झालेल्या विवरणपत्रात माहिती जमा करण्यात आली़ शासनाच्या आदेशानुसार या कुटूंबियांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला का? त्यांचे जीवनमान सध्या कसे आहे? या पुढे कुटूंबियांना कोणता लाभ देता येऊ शकतो का? याचे वर्गीकरण केले जाणार असून, त्यानुसार कुटूंबियांना आधार देण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली. दरम्यान, आर्थिक विवंचनेमध्ये घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या कुटूंबियांना प्रशासनाच्या या उपक्रमामुळे आधार मिळणार आहे़
साडेचारशे कर्मचा-यांची केली नियुक्ती
१ जानेवारी २०१२ ते ३० आॅक्टोबर २०१७ या काळात आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबियांची यादी प्रशासनाने तयार केली आहे़ या प्रत्येक कुटूंबियांच्या घरी जाऊन त्यांची माहिती १५ नोव्हेंबर रोजी एकत्रित करण्यात आली़ यासाठी प्रशासनातील ४५० अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती़ प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयांना शेतकरी कुटूंबियांची यादी देऊन बुधवारी दिवसभरात या कुटूंबियांना भेट देण्याचे नियोजन आखण्यात आले़ त्यानुसार अधिकाºयांनी बुधवारी ही माहिती संकलित केली आहे़
मनोबल उंचावण्यासाठी उपक्रम
शेतकरी कुटूंबातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यास कुटूंबाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होते़ कुटूंब उघड्यावर येते़ अशा कुटूंबांना शासन योजनांचा लाभ देत असले तरी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून या कुटूंबियांची परिस्थिती काय आहे? ही कुटूंबे स्वबळावर उभी राहिलीत का? याची पाहणी करणे आणि नैराश्याने ग्रासलेल्या कुटुंबियांचे मनोबल उंचावणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला़ विशेष म्हणजे मराठवाड्यात सर्वत्र हा उपक्रम राबविला जाणार आहे़. यानंतर प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची माहिती एकत्रित करून या कुटूंबियांना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभही दिला जाणार आहे़
असा आहे उपक्रम
विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी आत्महत्याग्रस्त कुटूंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची माहिती एकत्रित करण्यात आली़ १८ नोव्हेंबर रोजी या कुटूंबियांची माहिती स्वतंत्र विवरणपत्रात जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली जाणार आहे़ २४ नोव्हेंबर रोजी उपलब्ध माहिती संकेतस्थळावर भरली जाणार आहे़ २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या काळात जिल्हाधिकारीस्तरावर प्राप्त माहितीचे विश्लेषण केले जाणार असून, कुटूंबियांना कोणत्या योजनेचा लाभ देता येऊ शकतो, याची निश्चिती केली जाणार आहे तर ८ ते २२ डिसेंबर या काळामध्ये निश्चित केलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे़