लसीकरणासाठी जिल्हाधिकारी स्वत: फिरल्या प्रभागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:23 AM2021-09-09T04:23:28+5:302021-09-09T04:23:28+5:30
परभणी : शहरातील लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी मनपाने सुरू केलेल्या प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रभागात ...
परभणी : शहरातील लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी मनपाने सुरू केलेल्या प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रभागात फिरून नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देत केलेल्या आवाहनामुळे दिवसभर विविध केंद्रांवर मोठे लसीकरण झाले आहे.
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात लसीकरणाचा वेग कमी असल्याने महापालिकेने ‘एक दिवस, एक प्रभाग’ ही मोहीम सुरू केली आहे. ८ सप्टेंबरला प्रभाग क्र.१ मध्ये मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल सकाळीच प्रभाग क्र.१मध्ये दाखल झाल्या. या भागात त्यांनी विविध नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना लसीकरण करण्याचे आवाहन केले तसेच प्रभावतीनगरातील शाळेतील बुथवार त्यांनी भेट देऊन लसीकरणाची पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त देविदास पवार, अतिरक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त देविदास जाधव, सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, अल्केश देशमुख, झोन प्रमुख इमाम शाह यांचीही उपस्थिती होती. प्रभाग समिती अ अंतर्गत प्रभाग क्रमांक १ मधील नाथनगर, सिंचननगर, प्रभावतीनगर, विद्यानगर, बेलेश्वरनगर या परिसरात केंद्र सुरू लसीकरण करण्यात आले. प्रभावती विद्यालय, पाथरी रोडवरील सरस्वती विद्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग शनिवार बाजार, जिंतूर रोडवरील एसमएसईबी कार्यालयासमोर, नांदखेडारोड या ठिकाणी सकाळी १० वाजेपासून मोहीम राबविण्यात आली. नगरसेवक गणेश देशमुख, प्रसाद नागरे यांच्यासह मनपातील सर्व अधिकाऱ्यांनी या प्रभागात फिरून नागरिकांना लसीकरणाचे आवाहन केले. गोयल यांनी विद्यानगर, सागरनगर तसेच अन्य वसाहतींमध्ये जाऊन लसीकरण करून घेण्याचे आवाहन नागरिकांना केले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रभागात फिरून लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना गोयल यांनी यावेळी केल्या.
सरस्वती विद्यालय पाथरी रोड, वीज मंडळ विश्रामगृह जिंतूर रोड कार्यकारी अभियंता कक्ष अशा सात बुथ केंद्रांवर आयुक्त देवीदास पवार, अतिरिक्त आयुक्तांनी पाहणी करून नागरिकांना आवाहन केले.
आज प्रभाग २ मध्ये मोहीम
९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत प्रभाग क्रमांक २ मध्ये लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी २३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त देवीदास पवार यांनी केले आहे.