चार केंद्रांवर लसीकरणाची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:53 AM2021-01-08T04:53:02+5:302021-01-08T04:53:02+5:30
परभणी : कोरोना लसीकरणाच्या तयारीला आता वेग आला असून, प्रत्यक्ष लसीकरण करण्यापूर्वी अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सराव व्हावा त्याचप्रमाणे तयारीची माहिती ...
परभणी : कोरोना लसीकरणाच्या तयारीला आता वेग आला असून, प्रत्यक्ष लसीकरण करण्यापूर्वी अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सराव व्हावा त्याचप्रमाणे तयारीची माहिती त्यांना व्हावी, या उद्देशाने ८ जानेवारी रोजी जिल्ह्यातील चार केंद्रांवर रंगीत तालीम (ड्राय रन) केली जाणार आहे.
मागील सात- आठ महिन्यांत कोरोनाच्या साथीने जिल्हावासीयांना धास्तावून सोडले होते. मात्र, या महाभयंकर साथीवर देशात लस तयार झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. ही लस कधी मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातच राज्याच्या आरोग्य विभागाने ही लस सर्वप्रथम आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी आरोग्य विभागातील साडेसात हजार कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.
कोरोना लसीकरणासंदर्भात यापूर्वीच राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये ड्राय रन घेतला आहे. आता शुक्रवारी प्रत्येक जिल्ह्यात ड्राय रन घेतला जाणार असून, परभणीत त्यासाठी चार केंद्रांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय आणि सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय, जि.प.च्या आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत परभणी तालुक्यातील पेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि महानगरपालिकेच्या अंतर्गत इनायतनगर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्राय रन घेतली जाणार आहे. निवडणुकीच्या मतदानाच्या धर्तीवर ही लसीकरणाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हा ड्राय रन घेतला जाणार आहे.
प्रत्येक केंद्रावर २५ लाभार्थ्यांची निवड
प्रत्येक केंद्रासाठी २५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्राच्या ठिकाणी तीन कक्ष तयार केले आहेत. लाभार्थ्याचे ओळखपत्र तपासण्यात येईल. त्यानंतर पहिल्या कक्षात नोंदणी केलेल्या को-विन ॲपमध्ये लाभार्थ्याचे नाव आहे का? याची तपासणी केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या कक्षात लसीकरण करणे आणि तिसऱ्या कक्षात अर्धा तास लाभार्थ्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
तांत्रिक बाबींची होणार तपासणी
हे ड्राय रनमध्ये लसीकरण करण्यासाठी तयार केलेल्या तांत्रिक बाबींची तपासणी केली जाणार आहे. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या को-विन ॲपमध्ये कर्मचाऱ्यांची नावे आहेत का? त्यांना लसीकरणासंदर्भात संदेश पाठविला जातो का? लाभार्थ्याचे ओळखपत्र कसे तपासावे, तसेच लसीकरणानंतर काय काळजी घ्यावी, याची तपासणी होणार आहे.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
या रंगीत तालिमीसाठी प्रत्येक केंद्रावर ५ व्हॅक्सिनेशन ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना गुरुवारीच रंगीत तालिमीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात लसीकरणाच्या अनुषंगाने तयार केलल्या बुथचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.