'चला, बकाल परभणी दर्शनाला'; ऑटोतून करा पहाणी, जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांना निमंत्रण 

By मारोती जुंबडे | Published: June 25, 2024 11:49 AM2024-06-25T11:49:49+5:302024-06-25T11:50:42+5:30

परभणी शहरातील रस्ते चकाचक व्हावेत, यासाठी जवळपास ७० कोटींचा निधी मंजूर होता. मात्र या निधीत राजकारण झाल्याने स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्यानंतर ही स्थगिती उठवली. परंतु आचारसंहिता लागली.

'Come for Bakal Parbhani Darshan'; Inspect by auto, invite the Collector along with the Commissioner  | 'चला, बकाल परभणी दर्शनाला'; ऑटोतून करा पहाणी, जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांना निमंत्रण 

'चला, बकाल परभणी दर्शनाला'; ऑटोतून करा पहाणी, जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांना निमंत्रण 

परभणी: धुळीच्या लोटांसह बकाल झालेल्या रस्त्यावरून परभणीकरांना अनेक अडचणींचा सामना करून दररोज प्रवास करावा लागत आहे. परंतु याचे कोणतेही सोयर - सुतक प्रशासकीय अधिकाऱ्यांना राहिले नाही. त्यामुळे 'याची देही याची डोळा' परभणीची बकाल अवस्था पाहण्यासाठी आपण माझ्या ऑटोरिक्षातून मोफत परभणी शहराचे दर्शन करावे, असे साकडे ऑटो रिक्षा चालकाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांना घातले आहे.

परभणी शहरातील भारत नगर परिसरासह जिंतूर रस्ता ते दर्गा, मोठा मारुती मंदिर ते उघडा महादेव, डॉ. वाकुरे दवाखाना ते हडको वांगी रस्ता, जेल कॉर्नर ते आपना कॉर्नर तसेच धार रस्ता यांची बकाल अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दररोज अबालवृद्धांसह रुग्ण, महिला व लहान मुला बाळांची रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मोठी आदळ आपट होत आहे. परिणामी आरोग्याच्या अनेक समस्या नागरिकांना उद्भवत आहेत. त्याचबरोबर परभणी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर धुळीचे मोठ्या प्रमाणात लोट उठत आहेत. परिणामी, दुचाकीस्वारांना श्वसनाचे मोठे आजार जडले आहेत. त्यामुळे खाजगीसह शासकीय दवाखाने हाउसफुल दिसत आहेत. परभणी शहरातील रस्त्यांसह धूळ व इतर समस्या सोडवाव्यात, यासाठी अनेक परभणीकरांनी आतापर्यंत आपणास निवेदने, आंदोलने करून साकडे घातले. परंतु आपण या निवेदनांना केराच्या टोपल्यात टाकून व आंदोलनाकडे कानाडोळा करून जसे थे च परिस्थिती असावी अशी आपली इच्छा असेल त्यामुळेच हे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे आपण माझ्या ऑटोरिक्षामध्ये आपणास जेव्हा वेळ असेल तेव्हा मोफत प्रवास करून परभणी शहरातील रस्त्यावरून परभणीकरांना दररोज प्रवास करताना येणारे अनुभव आपण स्वतः अनुभवावेत, असे साकडे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांना एका निवेदनाद्वारे ऑटो चालक संदीप खाडे यांनी साकडे घातले आहे.

निमंत्रण स्वीकारण्याची व्यक्त केली अपेक्षा 
ऑटो रिक्षा चालक संदीप खाडे यांना दररोज रिक्षा चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा रस्ता दुरुस्ती बाबत मोठमोठ्या घोषणा झाल्या. मात्र त्या प्रत्यक्षात आल्या नाहीत. यास प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी ही तेवढेच जबाबदार आहेत. किमान प्रशासनाने परभणीकरांना दररोज सहन कराव्या लागणाऱ्या यातनांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, यासाठी संदीप खाडे यांनी निवेदनाद्वारे परभणी दर्शनाचे निमंत्रण दोन मुख्य अधिकाऱ्यांना दिले आहे. हे अधिकारी आपल्या वेळेनुसार माझे निमंत्रण स्वीकारतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली 

विकासाऐवजी राजकारणच अधिक 
परभणी शहरातील रस्ते चकाचक व्हावेत, यासाठी जवळपास ७० कोटींचा निधी मंजूर होता. मात्र या निधीत राजकारण झाल्याने स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्यानंतर ही स्थगिती उठवली. परंतु आचारसंहिता लागली. त्यामुळे परभणी शहरांच्या विकासाऐवजी मिळालेल्या निधीत राजकारणच अधिक दिसून येत आहे. त्यामुळे परभणीकरांच्या नशिबी दररोज सकाळी उठल्यापासून धूळ, खड्डेमय रस्ते, वाहनांचा कर्कश आवाज, वाहतूक कोंडी आणि पावसाने खड्ड्यात साचलेले पाणी एवढेच लिहून ठेवले की काय? असा प्रश्न आता परभणीकरांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे.

Web Title: 'Come for Bakal Parbhani Darshan'; Inspect by auto, invite the Collector along with the Commissioner 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.