कंत्राटदारांची करा तक्रार; मात्र ब्लॅकमेलींगसाठी नको; नितीन गडकरींचे लोकप्रतिनिधींना खडेबोल
By मारोती जुंबडे | Published: February 25, 2023 04:41 PM2023-02-25T16:41:52+5:302023-02-25T16:42:11+5:30
लोकप्रतिनिधींनी कामे व्यवस्थित होत नसतील तर तक्रारी केल्या पाहिजे, परंतु ब्लॅकमेलिंगसाठी तक्रारी करू नयेत
परभणी: कंत्राटदारांकडून चांगली कामे होत नसतील तर रस्त्याच्या दर्जेदार कामासाठी त्यांची तक्रार करा,मात्र केवळ ब्लॅकमेलिंगसाठी करु नका, असे खडेबोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरात शनिवारी आयोजित कार्यक्रमात लोकप्रतिनिधींना व्यासपीठावरच सुनावले.
जिल्ह्यातील पारवा-असोला बाह्यवळण रस्ता, जिंतूर-शिरड शहापूर आणि पाथरी ते सेलू या राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरण आणि सुधारणेच्या भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. याप्रसंगी खासदार संजय जाधव, विधान परिषद सदस्य विप्लव बाजोरिया, आमदार सुरेश वरपुडकर, डॉ. राहुल पाटील, डॉ. रत्नाकर गुट्टे, मेघना बोर्डीकर-साकोरे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश देशमुख, मोहन फड, जिल्हाधिकारी आंचल गोयल, कुलगुरु डॉ. इंद्र मणी, राष्ट्रीय महामार्गाचे प्रशांत हेगडे, संतोष शेलार आदींची उपस्थिती होती.
यावेळी गडकरी यांनी परभणी जिल्हा हा गोदावरी खोऱ्यात असल्यामुळे येथील काळ्या कसदार जमिनीमध्ये डांबरी रस्ते जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून बांधले जाणारे येथील सर्व रस्ते हे सिमेंटचेच बांधण्यात येतील. परभणी शहराला लागून जाणारा पारवा –असोला या बाह्यवळण रस्त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले असून, दुसऱ्या बाह्यवळण रस्त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांनी पुढील सहा महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लक्ष दिल्यास वर्षभरात त्याचेही काम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा गडकरी यांनी यावेळी केली. जिल्ह्यातील राष्ट्रीय रस्ते विकासाच्या कामात आलेल्या अडचणीची कारणे माहीत नाहीत. बरीचशी कामे अर्धवट झाली, डांबरी रस्ते टिकत नाहीत. कंत्राटदार कामे कमी दाराने घेतात. मात्र लोकप्रतिनिधींनी कामे व्यवस्थित होत नसतील तर तक्रारी केल्या पाहिजे, परंतु ब्लॅकमेलिंगसाठी तक्रारी करू नयेत असे खडेबोल व्यासपीठावर उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुनावले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.