हवामान खात्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार!, पावसाचा अंदाज खोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:28 AM2018-08-08T05:28:06+5:302018-08-08T05:28:21+5:30
या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडेल, असा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खोटा ठरला.
परभणी : या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडेल, असा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खोटा ठरला. त्यामुळे आपली व राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून हवामान खात्याच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम यांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर कदम यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मे महिन्यामध्ये विविध प्रसारमाध्यमांमध्ये हवामान खात्याच्या वतीने मराठवाडा व राज्यातील इतर ठिकाणी २०१८मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; परंतु, तो सपशेल खोटा ठरला आहे. मराठवाड्यात आजही १४० महसूल मंडळामध्ये गंभीर पाणीटंचाई व दुष्काळ आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५पैकी ५६ मंडळे कोरडीठाक आहेत. परभणी जिल्ह्यातील ३८पैकी ८ ते १० मंडळांमध्ये जेमतेम पाऊस आहे. जालना जिल्ह्यामध्येसुद्धा ५५पैकी ७ मंडळांमध्ये मध्यम पाऊस आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात १६ दिवस, जुलै महिन्यामध्ये १३ दिवस व आॅगस्ट महिन्यात एकही दिवस पाऊस झालेला नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने खत, बियाणे, औषधी उत्पादक कंपन्यांकडून विविध प्रकारचे पॅकेज घेऊन व शेअर बाजरातून उलाढाल वाढविण्यासाठी चुकीची माहिती महाराष्ट्र शासन व शेतकºयांना दिली आहे. आशिया खंडातील सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात झाल्या आहेत. अशा चुकीच्या माहितीमुळे हा आकडा रोज वाढत आहे. त्यामुळे या बाबींची चौकशी करून हवामान खात्याच्या संचालकांवर भादंवि ४२०नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असेही या तक्रारीत म्हटले आहे.