संगणक अभियंत्याची २ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:17 AM2021-03-05T04:17:54+5:302021-03-05T04:17:54+5:30
शहरातील खानापूर फाटा भागातील श्रीनिवास उत्तम गुट्टे हे हैद्राबाद येथील एका कंपनीत नोकरीस आहेत. सध्या कोरोनामुळे ते घरूनच कंपनीचे ...
शहरातील खानापूर फाटा भागातील श्रीनिवास उत्तम गुट्टे हे हैद्राबाद येथील एका कंपनीत नोकरीस आहेत. सध्या कोरोनामुळे ते घरूनच कंपनीचे काम करीत आहेत. २ मार्च रोजी त्यांना त्यांच्या कंपनीचे सीईओ आशिष बजाज यांच्या नावाने असलेल्या आयडीवरून एक मेल आला. त्यात तुझ्याकडे एक महत्त्वाचे काम आहे. तू मोकळा असल्यास मला सांग, असे नमूद केले होते. त्यामुळे गुट्टे यांनी त्यावर रिप्लाय दिला. त्यानंतर अडचण असल्याचे सांगूण २५ हजार ४०० रुपये एका व्यक्तीला पाठव, असे समोरील व्यक्तीने मेलद्वारे सांगितले. त्यामुळे गुट्टे यांनी सीईओ बजाज यांना फोन केला असता त्यांनी उचलला नाही. काही क्षणात दुसरा मेल आला. त्यात काम होणार असेल तर सांग, वाट पाहत आहे, असे नमूद केले होते. त्यामुळे गुट्टे यांनी बजाज मीटिंगमध्ये असतील असे समजून पेटीएमवरून 79802010004992 या सिंडिकेट बँकेच्या खात्यावर पैसे पाठवले. त्यानंतर त्यांना टप्प्याटप्प्याने पैशांची मागणी केली गेली. त्यानुसार बजाज यांना काम असेल म्हणून गुट्टे यांनी ७५ हजार ९००, १ लाख रुपये कॅनरा बँकेच्या खात्यावर पाठवले. समोरील व्यक्तीने पुन्हा २ लाख ५० हजारांची मागणी केली; परंतु गुट्टे यांनी ही रक्कम पाठवली नाही. काही वेळाने सीईओ बजाज यांचा गुट्टे यांना फोन आला. त्यावेळी त्यांना गट्टे यांनी पैशांविषयी सांगितले असता, त्यांनी आपण पैसे मागितले नसल्याचे सांगितले. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नवा मोंढा पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.