२०५ मागासवर्गीय सदस्यांना प्रमाणपत्रांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:09+5:302021-03-19T04:17:09+5:30

देवगावफाटा : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या सेलू तालुक्यातील २०५ उमेदवारांनी अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. ...

Concern for 205 backward class members | २०५ मागासवर्गीय सदस्यांना प्रमाणपत्रांची चिंता

२०५ मागासवर्गीय सदस्यांना प्रमाणपत्रांची चिंता

Next

देवगावफाटा : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या सेलू तालुक्यातील २०५ उमेदवारांनी अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे या नूतन सदस्यांना प्रमाणपत्रांची चिंता लागली आहे.

सेलू तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी पार पडली. या निवडणुकीत ५१९ पैकी ५१७ जागांवरील उमेदवार विजयी झाले. दोन जागा रिक्त आहेत. विजयी ५१७ उमेदवारांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ६८, अनुसूचित जमाती प्रवर्गातील १ व इतर मागास प्रवर्गातील १३६ उमेदवारांचा समावेश आहे. १८ जानेवारी रोजी निवडणुकांचा निकाल घोषित झाला. त्यानंतर आठवडाभरात राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांची यादी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कार्यवाहीसाठी तालुका प्रशासनाकडून सादर करणे अपेक्षित होते. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. जवळपास दोन महिने झाले तरी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला प्रस्ताव सादर केलेला नाही. निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या आत हे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेस वेळ लागतो. त्यामुळे एक वर्षाच्या आत हे प्रमाणपत्र मिळवून ते निवडणूक विभागाला सादर करण्याची चिंता नूतन सदस्यांना लागली आहे. त्यामुळे हे सदस्य प्रस्ताव दाखल केल्याची पोहोच पावती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे घेऊन चकरा मारत आहेत. परंतु, त्यांना सेलू येथील निवडणूक विभागाकडून अशी कोणतीही यादी आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी हे नूतन सदस्य या कार्यालयाचे उंबरठे झिझवतांना दिसून येत आहेत. या अनुषंगाने जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी निवडणूक विभागाकडून प्रस्ताव आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगितले. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

३० उमेदवारांची सरपंचपदी निवड

मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागांवर तालुक्यात एकूण २०५ उमेदवार निवडून आले आहेत. त्यातील ३० उमेदवारांची संबंधित गावच्या सरपंचपदी वर्णी लागली आहे. असे असले तरी त्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध नाही. त्यामुळे लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळवून आपले सरपंचपद अबाधित ठेवण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. परंतु, निवडणूक विभागाकडूनच सूत्र हालत नसल्याने या सरपंचांना प्रमाणपत्रांची चिंता सतावत आहे.

Web Title: Concern for 205 backward class members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.