कृषीधोरण अभियानातून शेतकऱ्यांना बिलात सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:48 AM2021-02-20T04:48:20+5:302021-02-20T04:48:20+5:30
पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात महावितरण कंपनीकडून कृषिपंपाचे थकीत वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी सवलत दिली जाणार आहे. यासाठी ...
पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात महावितरण कंपनीकडून कृषिपंपाचे थकीत वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी सवलत दिली जाणार आहे. यासाठी तालुक्यात कृषी धोरण अभियान राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना बिल भरणा केल्यानंतर सेल्फी काढण्यासाठी सेल्फी पॅाईंटही तयार करण्यात आला आहे.
पालम तालुक्यातील ग्रामीण भागात ६ हजार शेतकऱ्यांकडे कृषिपंपाचे वीजबिल थकीत आहेत. त्यामुळे अनेकदा रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करावा लागतो. शासनाने वीजबिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘कृषी धोरण - २०२१’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानातून थकबाकीच्या ३० टक्के रक्कम भरून चालू खातेदार होता येणार आहे. यातही बिल भरण्यासाठी टप्पे पाडून दिले जात आहेत. थकीत रक्कम भरल्यानंतर प्रत्येक गावात शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ग्रामविकास कामे, ३३ टक्के रक्कम त्या गावातील विद्युत अद्ययावतीकरण व ३४ टक्के रक्कम तालुका महावितरण कार्यालयात खर्चासाठी वापरली जाणार आहे. या अभियानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपअभियंता व्ही. डी. स्वामी यांनी केले आहे.
पालममध्ये बनवला सेल्फी पाईंट
पालमच्या महावितरण कार्यालयात कृषिपंपाच्या वीजबिलाची थकीत रक्कम भरल्यानंतर अन्य शेतकऱ्यांनी या अभियानाकडे वळावे, यासाठी बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सेल्फी घेण्यासाठी सेल्फी पाईंट बनवला आहे. याठिकाणी सेल्फी काढून तो समाजमाध्यमांतून प्रसारित करण्यात येणार आहे.