रुग्णवाहिकांअभावी आठ प्राथमिक केंद्रांतील रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:17 AM2021-03-08T04:17:38+5:302021-03-08T04:17:38+5:30
परभणी : जिल्ह्यात सद्यस्थितीत ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यापैकी केवळ ३२ आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका असून, त्यातील दोन केंद्रांकडे ...
परभणी : जिल्ह्यात सद्यस्थितीत ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यापैकी केवळ ३२ आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका असून, त्यातील दोन केंद्रांकडे भाड्याच्या रुग्णवाहिका आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ८ केंद्रांतील रुग्णांचे रुग्णवाहिकेअभावी हाल होत आहेत.
परभणी जिल्ह्यातील रुग्णांना आपल्या गाव परिसरात उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली. त्यात कोरोनाच्या काळात ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे नव्याने कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे सध्या ३७ केंद्रांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात येतात. मात्र, या केंद्रांमधून गंभीर व अत्यावश्यक रुग्णांना उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालय वा खासगी रुग्णालयात रेफर केले असता, रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय वा खासगी रुग्णालय गाठताना खिळखिळ्या व नादुरुस्त रुग्णवावाहिकेतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे.
३७ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यान्वित
परभणी जिल्ह्यात ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यान्वित असून, यातील २९ केंद्रांकडे स्वत:ची रुग्णवाहिका आहे. मात्र, सेलू तालुक्यातील देऊळगाव व वालूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भाड्याच्या रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागते. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देऊन या केंद्रांना स्वत:च्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
दररोज ५० रुग्णांना केले जाते रेफर
जिल्ह्यातील ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून दिवसभरात जवळपास ५० गंभीर रुग्णांना अत्यावश्यक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वा खासगी रुग्णालयाकडे रेफर केले जाते. त्यामुळे अद्ययावत रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे. मात्र, आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
सहा केंद्रांना रुग्णवाहिकाच नाहीत
जिल्ह्यात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या शेळगाव, बनवस, आर्वी, एरंडेश्वर, चारठाणा व मरडसगाव या केंद्रांना रुग्णवाहिकांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या केंद्रातील रुग्णांना बाहेरगावी उपचारासाठी जाताना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
रुग्णवाहिकेच्या विम्याकडे दुर्लक्ष
प्राथमिक आरोग्य केंद्रातून इतर रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाताना रुग्णवाहिका रस्त्याने सुसाट वेगाने नेल्या जातात. त्यामुळे या रुग्णवाहिकेचा विमा असणे गरजेचे असताना, बहुतांश रुग्णवाहिकांचा विमा नसल्याचे समजते.
नादुरुस्त रुग्णवाहिकांचा वैताग
आरोग्य विभागाकडून ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे रुग्णवाहिका असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी बहुतांश रुग्णवाहिका या अनेकदा नादुरुस्त असतात. त्यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. २९ प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे शासकीय रुग्णवाहिका आहेत. वालूर व देऊळगाव या दोन केंद्रांना भाड्याच्या रुग्णवाहिका आहेत. उर्वरित सहा नवीन प्राथमिक केंद्रांसाठी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे रुग्णवाहिकांसाठी पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. शंकरराव देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, परभणी