संघर्ष, समस्यांमधूनच सापडतो यशाचा मार्ग- उज्ज्वल निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:11 AM2018-11-18T00:11:15+5:302018-11-18T00:11:23+5:30
संघर्ष आणि समस्यांशी दोन हात करतानाच यशाचा खरा मार्ग सापडत असतो़ स्वत:मधील आत्मविश्वास संघर्ष करण्याची प्रेरणा देतो़ त्यामुळे संघर्षापासून दूर न जाता त्याचा सामना करायला शिका, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी अभियोक्ता पद्मश्री अॅड़ उज्ज्वल निकम यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : संघर्ष आणि समस्यांशी दोन हात करतानाच यशाचा खरा मार्ग सापडत असतो़ स्वत:मधील आत्मविश्वास संघर्ष करण्याची प्रेरणा देतो़ त्यामुळे संघर्षापासून दूर न जाता त्याचा सामना करायला शिका, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी अभियोक्ता पद्मश्री अॅड़ उज्ज्वल निकम यांनी केले़
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १७ नोव्हेंंबर रोजी ‘युवकांची सामाजिक जबाबदारी व भविष्यातील आव्हाने’ या विषयावर निकम बोेलत होते़ अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ़ अशोक ढवण तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, शिक्षण संचालक डॉ़ विलास पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले, कुलसचिव रणजीत पाटील, प्राचार्य डॉ़ धर्मराज गोखले आदींची उपस्थिती होती़
जीवनात ज्ञानाची भूक पाहिजे़ तपश्चर्यने ज्ञान संपादन होते़ विद्यार्थ्यांनी बुद्धीचे सामर्थ्य ओळखले पाहिजे़, असे सांगून आपल्याकडे प्रामाणिकपणा असल्यास गुन्हेगारांच्या मनातही दबदबा निर्माण करू शकतो, असे ते म्हणाले़ महाविद्यालयातील रॅगिंगच्या प्रकारामुळे ग्रामीण विद्यार्थ्यामध्ये नैराश्य येते़ त्यामुळे नवप्रवेशित विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले़
कार्यक्रमात कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांच्या हस्ते अॅड़ उज्ज्वल निकम यांचा सत्कार करण्यात आला़ तसेच विद्यापीठातील यशस्वी विद्यार्थी रुपेश बोबडे, रंगोली पडघन, प्रतीक्षा पवार, शैलेंद्र कटके, देवयानी शिंदे, मंजुषा कातकडे, शुभम राय यांचा अॅड़ निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ डॉ़ मृण्मयी भजक यांनी सूत्रसंचालन केले़ डॉ़ विलास पाटील यांनी आभार मानले़