OBC विरोधात काँग्रेस अन् भाजप एकत्र, जानकरांनी सांगितली गोपीनाथ मुंडेंची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 04:01 PM2021-12-20T16:01:07+5:302021-12-20T16:04:13+5:30
काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष ओबीसींना न्याय देऊ शकत नाहीत. भाजपचा देखील ओबीसी आरक्षणाला विरोध होता, पण त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठवला होता, अशी आठवण जानकर यांनी सांगितली.
परभणी - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे, ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आणि संघटनांनी एकत्र येऊन सरकारविरुद्ध आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. ओबीसी समाजाचं राज्यातील 27 टक्के राजकीय आरक्षण रद्दबातल केल्यामुळे सध्या होत असलेल्या 105 नगरपंचायतींच्या निवडणुकीत ओसीबी समजाला स्थान नाही. त्यामुळे, विविध संघटना आणि नेते एकत्र येऊन मेळावे व बैठका घेत आहेत. परभणीतील एका मेळाव्याला रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी, काँग्रेस आणि भाजपवर त्यांनी टीका केली.
काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष ओबीसींना न्याय देऊ शकत नाहीत. भाजपचा देखील ओबीसी आरक्षणाला विरोध होता, पण त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठवला होता, अशी आठवण जानकर यांनी सांगितली. ओबीसींचं आरक्षण जाण्याला काँग्रेस आणि भाजपा दोघेही जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये ओबीसी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात महादेव जानकर बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, जेव्हा कलम 340 आणि 341 लिहिलं गेलं तेंव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी ओबीसी आरक्षणाला तमाम भारतीय जनता पक्षाचा विरोध होता. मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठवला होता. भाजपात ओबीसीबाबत बोललं की संपवलं जातं, असा आरोपच जानकर यांनी केला.
परभणी महाराष्ट्र में #ओबीसी_आरक्षण_बचाव_कृती_समिती द्वारा आयोजित धरना प्रदर्शन कार्यक्रम में आज उपस्थित रहने का मौका मिला। pic.twitter.com/AQCVLgjmuJ
— Mahadev Jankar (@MahadevJankarR) December 18, 2021
आम्ही भाजपचे चेले नाहीत, किंवा काँग्रेसचे दलालही नाही. त्यामुळे, ओबीसींच्या बाबतीत आवाज उठविण्यासाठी केव्हाही तयार आहोत. ओबीसींचा इम्पेरिकल डेटा ने देण्याचं काँग्रेस आणि भाजप यांनी एकत्रितपणे ठरवल्याचा आरोपही जानकर यांनी येथील मेळाव्यात बोलताना केला.