परभणी जिल्ह्यातील ९६ आरोग्य उपकेंद्रात होणार सौरप्रकल्पाची उभारणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 06:53 PM2018-01-31T18:53:04+5:302018-01-31T18:53:43+5:30

 जिल्हाभरातील आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी वीज पुरवठ्याची समस्या निर्माण होत असल्याने जिल्हाभरातील ९६ आरोग्य उपकेंद्रामध्ये सोलार पॉवर प्लान्टची उभारणी करण्याचा निर्णय जि.प.ने घेतला आहे. सोमवारी जिल्हा आरोग्य समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आल्याचे जि.प.उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी सांगितले.

Construction of Solar Power at 96 health sub centers in Parbhani district | परभणी जिल्ह्यातील ९६ आरोग्य उपकेंद्रात होणार सौरप्रकल्पाची उभारणी  

परभणी जिल्ह्यातील ९६ आरोग्य उपकेंद्रात होणार सौरप्रकल्पाची उभारणी  

googlenewsNext

परभणी : जिल्हाभरातील आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी वीज पुरवठ्याची समस्या निर्माण होत असल्याने जिल्हाभरातील ९६ आरोग्य उपकेंद्रामध्ये सोलार पॉवर प्लान्टची उभारणी करण्याचा निर्णय जि.प.ने घेतला आहे. सोमवारी जिल्हा आरोग्य समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आल्याचे जि.प.उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी वीज पुरवठ्याची समस्या निर्माण होत आहे. अनेक वेळा रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकार्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचा फटका रुग्णांना बसत होता. त्यामुळे जिल्हा परिषदेने जिल्हाभरातील आरोग्य केंद्रामध्ये सोलार पॉवर प्लॉट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्ह्यातील २३ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सौर पॉवर प्लान्ट बसविले़ तर उर्वरित ७ आरोग्य केंद्रामध्ये लवकरच हे प्लान्ट बसविण्यात येणार आहेत.  

आरोग्य उपकेंद्रामध्ये मात्र सौर प्लॉट बसविण्यात आले नव्हते़ त्यामुळे याही केंद्रामध्ये सौर प्लान्ट उभारावेत, अशी मागणी होत होती़ यासंदर्भात २९ जानेवारी रोजी जिल्हा परिषद आरोग्य समितीची बैठक सभापती भावनाताई नखाते यांच्या दालनामध्ये घेण्यात आली. या बैठकीत सोलार पॉवर प्लॉट उभारण्यास मान्यता देण्यात आली़ यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीमधून हा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्युत पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 
या बैठकीस श्रीनिवास जोगदंड, सुष्मा देशमुख, विशाखा सोळंके, वसुंधरा घुबरे, उमा वाकणकर, अंजली देशमुख, शालिनीताई राऊत, डॉ.बालाजी शिंदे आदींची उपस्थिती होती. 

दुर्धर आजाराच्या रुग्णांसाठी १४ लाखांचा निधी
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दुर्धर आजाराच्या रुग्णांना १० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी अर्ज मागविले होते. यामध्ये कॅन्सर, किडणी, हृदयविकार आदी आजारांचा समावेश होता. जिल्हाभरातून १८० अर्ज जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. 
या बैठकीत या अर्जाची छाननी करण्यात आली. यावेळी १८० पैकी १४० अर्जांना मंजुरी देण्यात आली असून या लाभार्थ्यांच्या खात्यावर ८ दिवसांमध्ये प्रत्येक १० हजार रुपये जमा केले जातील, अशी माहिती आरोग्य सभापती भावनाताई नखाते यांनी दिली. यावेळी जि.प. अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, मुख्यलेखा व वित्त अधिकारी ज्योती भोंडे, डॉ.बालाजी शिंदे आदी उपस्थित होते. 

आशा स्वयंसेविकांना  अनुदान देण्याचा ठराव
या बैठकीमध्ये जानेवारी २०१८ पासून आरोग्य केंद्रातील बायोमॅट्रीक उपस्थितीनुसार कर्मचार्‍यांचे वेतन अदा करावे, असा निर्णय घेण्यात आला. तसेच औषधीचा पुरवठा करणे यासोबत आशा स्वयंसेविकांना प्रती लाभार्थ्यांसाठी ३०० रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, अशा शिफारसीचा ठराव यावेळी घेण्यात आला.

Web Title: Construction of Solar Power at 96 health sub centers in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.