आठ तासांच्या चौकशीनंतर कंत्राटदार ईडीच्या ताब्यात; खासदार गवळी यांच्या संस्थेशी आहे संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 01:39 PM2021-09-28T13:39:10+5:302021-09-28T13:49:19+5:30
यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यासोबत मागील तीन वर्षांपासून पाथरी येथील कंत्राटदार सईद खान उर्फ गब्बर बिरबल खान यांची व्यावसायिक भागीदारी
पाथरी (जि.परभणी) : शिवसेनेच्या ( Shiv Sena ) यवतमाळच्या खासदार भावना गवळी ( MP Bhawana Gawali ) यांच्याशी संबधित संस्थेमधील संचालक तथा पाथरी येथील कंत्राटदार सईद खान याला ईडीने ( Enforcement Directorate ) सोमवारी तब्बल आठ तास चौकशी करून अटक केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यासोबत मागील तीन वर्षांपासून पाथरी येथील कंत्राटदार सईद खान उर्फ गब्बर बिरबल खान यांची व्यावसायिक भागीदारी आहे. खान यांची पुर्वी पाथरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता एवढीच ओळख होती. राष्ट्रवादीच्या माजी मंत्री तथा राज्यसभा खासदार फौजिया खान यांच्या संपर्कात आल्यानंतर ते राजकारणात अधिक सक्रिय झाले. विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग वाढला. २०१६ ची पाथरी नगरपालिकेची निवडणूक त्यांनी परिवर्तन विकास पॅनलखाली लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते जालना येथील शिवसेनेच्या एका आमदारांच्या संपर्कात आले. त्यानंतर खासदार भावना गवळी यांच्याशी त्यांची ओळख झाली व ओळखीचे रुपांतर व्यवसायिक भागीदारीत झाले. त्यानंतर त्यांचा मुंबईतील राबता अधिक वाढला. यातूनच त्यांनी मुंबईत कार्यालय सुरू केले. तेथून त्यांचा मंत्रालयात वावर वाढला.
३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता ईडीने त्यांच्या पाथरी येथील घरावर धाड टाकली. विशेष म्हणजे ईडीची धाड पडण्यापुर्वी एक दिवस आगोदर ते पाथरी येथून निघून गेले होते. त्यांच्या घराची ईडीने झाडाझडती घेतली. याबाबत स्थानिक पोलिसांना कसलीही माहिती देण्यात आली नव्हती. पथकासोबत केंद्रीय राखीव दलाचे पोलीस होते. ७ तासांच्या तपासणीनंतर ईडीचे पथक मुंबईला निघून गेले. त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मुंबईत सईद खानला ईडीने चौकशीसाठी बोलावले. तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
भावाचे अलिशान लग्न
पाथरी येथील एकता नगर भागात सईद खान याचे दोन मोठे बंगले आहेत. वर्षभरापुर्वी सईद खानच्या भावाचे पाथरी येथे लग्न झाले होते. हे भागातील सर्वाधिक अलिशान लग्न होते, अशी चर्चा परिसरात होती. या लग्नासाठी एका मंत्र्याचा मुलगा हेलिकॉप्टर घेऊन आला होता. त्यामुळे या लग्नाची अधिक चर्चा झाली.