परभणी महापालिकेत नळ जोडणी प्रक्रियेतून कंत्राटदार हद्दपार; विभागीय आयुक्तांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 07:56 PM2020-02-14T19:56:39+5:302020-02-14T20:00:05+5:30
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची कडक भूमिका
परभणी : शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नळ जोडणी दर प्रक्रियेतून थेट कंत्राटदारालाच हद्दपार करुन नागरिकांनीच साहित्य आणावे व मनपाने फक्त अनामत रक्कम घेऊन नळ जोडणी द्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपा आयुक्त रमेश पवार यांना दिले आहेत.
शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नळ जोडणीचे दर निश्चित करण्याच्या संदर्भात प्रारंभीच्या दोन सर्वसाधारण सभेत निर्णय झाला नाही. त्यामुळे उन्हाळ्यातही नव्या योजनेचे पाणी मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपा आयुक्त रमेश पवार यांना फोन करुन नागरिकांना परवडेल, अशा दरात तातडीने नळ जोडणी द्या. मोठ्या परिश्रमाने ही योजना पूर्ण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना या योजनेचे पुरेपुर पाणी मिळाले पाहिजे, असे आदेश दिले होते. नंतरच्या काळात आयुक्त केंद्रेकर यांच्या आदेशाचा काही मनपा सदस्यांनी चुकीचा अर्थ काढला व मनपाच्या २७ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत २ हजार रुपये अनामत रक्कम व ९ हजार रुपये खाजगी एजन्सीला नळ जोडणी, मीटर, रस्ता खोदकाम आदींसाठी देण्यास बंधनकारक केले व सदरील दरांना विभागीय आयुक्त केंद्रेकर यांचीच मंजुरी असल्याचा अपप्रचार चालविला गेला. प्रत्यक्षात त्यांचा दर प्रक्रियेत काहीही संबध नव्हता.
याबाबत बुधवारी मनपा आयुक्त पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. त्यावेळी पवार यांनी याबाबत आपणास काहीही माहित नसल्याचे सांगितले. त्यांच्या नावाचा दुरुपयोग होत असल्याची बाब केंद्रेकर यांच्यापर्यंत पोहचली. त्यानंतर त्यांनी मनपा आयुक्त पवार यांना गुरुवारी धारेवर धरले व याचा जाब विचारला. परभणीचे आपण नागरिक आहोत, म्हणून शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, ही आपली भूमिका आहे. त्यामुळेच नळ योजनेच्या पाण्याचा लाभ सर्व नागरिकांना तातडीने मिळाला पाहिजे. नळ जोडणीचे दर सर्वसामान्यांना परवडतील, असेच असावेत, असे त्यांनी सांगितले. नळ जोडणी देण्याचे काम मनपाचे आहे. त्यामुळे यात कंत्राटदाराची काय गरज आहे? नागरिकच नळ जोडणीचे साहित्य घेऊन येतील. मनपाने अधिकृत २० ते २५ प्लंबर नियुक्त करावेत, त्यांना प्रशिक्षण द्यावे व त्यांच्या मार्फत नळ जोडण्या द्याव्यात, यासाठी नळ जोडणीच्या अनामत रक्कमेसह जे काही दर आहेत, ते मनपाने घेऊन नागरिकांना नळ जोडणी द्यावी. नळ जोडणीसाठी करण्यात आलेले रस्त्याचे खोदकाम दुरुस्त करण्याची मनपाची जबाबदारी आहे. त्याचा नागरिकांवर भुर्दंड टाकू नये. लागले तर यासाठी विशेष निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठवावा, असे केंद्रेकर यांनी सांगितले. नळ जोडणीच्या दरासंदर्भात आ.सुरेश वरपूडकर यांच्याशी चर्चा केली आहे. ते हे ही या संदर्भात सकारात्मतक असल्याचे केंद्रेकर यांनी सांगितले. याबाबत मनपा आयुक्त पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबींना दुजोरा दिला. या संदर्भात मनपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
नळ जोडणीच्या दराचे अंदाजपत्रक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी मनपाला तयार करुन दिले होते. विशेष म्हणजे ३ प्रकारचे अंदाजपत्रक या अधिकाऱ्यांनी मनपाला दिल्याची बाब विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांना गुरुवारी सकाळी बोलावून घेऊन धारेवर धरले. तसेच परभणी शहरात पाणी आणून देणे हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे काम आहे. बाकी दराबाबत मनपा निर्णय घेईल, त्यात तुम्ही लुडबूड का करता? असा सवाल करुन प्राधिकरणच्या अंदाजपत्रकामुळेच गडबडी झाल्या. त्यामुळे प्राधिकरणच्या सर्व अंदाजपत्रकांची तपासणी करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
अनधिकृत जोडणी घेतल्यास गुन्हे दाखल करा -केंद्रेकर
नळ जोडणीचे दरही कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे ही योजना सुरळीत चालविण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. अनधिकृतपणे जर कोणी नळ जोडणी घेत असेल तर या संदर्भात संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त पवार यांना दिले असल्याचे केंद्रेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तसे पत्र जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.