सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट भाजप पदाधिकाऱ्यास भोवली; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 02:49 PM2022-04-29T14:49:15+5:302022-04-29T14:49:33+5:30
दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे प्रकरण
पाथरी ( परभणी) : फेसबुक आणि इतर सोशल मीडियात वादग्रस्त पोस्ट शेअर करणे एका भाजप पदाधिकाऱ्यास चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुरुवारी रात्री पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 28 एप्रिल रोजी भाजपचे जिल्हा पदाधिकारी बाळासाहेब जाधव यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये वादग्रस्त संदेश असल्याने दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकत होता. यामुळे पोहे उत्तम हिरक यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब जाधव यांच्याविरुद्ध कलम 153 ए प्रमाणे 28 एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मिडीयावर पोलिसांचा वॉच
सोशल मिडीयावरील कोणाचे बंधन नसल्याचे काही समाजकंटक वादग्रस्त पोस्ट व्हायरल करत असतात. अशा पोस्ट दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या ठरू शकतात. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी देखील सोशल मिडीयावर वॉच ठेवणे सुरु केले आहे. यामुळे अशा पोस्ट तत्काळ हटवणे शक्य होत आहे. तसेच जाणीवपूर्वक असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर पोलीस देखील तत्काळ कारवाई करत आहेत.