शांतता समितीच्या बैठकीतच वाद; अवैध धंद्यावरून आमदार आणि पोलीस अधिकाऱ्यात खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 06:15 PM2022-08-29T18:15:24+5:302022-08-29T18:15:50+5:30
आमदार डाॅ.रत्नाकर गुट्टे यानी गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून अवैध धंद्याना आळा घालावा अशी मागणी केली.
गंगाखेड (परभणी): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीतच वाद झाल्याचा प्रकार आज घडला. अवैध धंद्यांच्या मुद्द्यावर आमदार आणि पोलीस अधिकारी आमनेसामने आल्याने बैठकीत वातावरण चांगलेच गरम झाले. हा सर्व प्रकार आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला.शांतता समितीच्या बैठकीत आमदार डाॅ.रत्नाकर गुट्टे यांनी अवैध धंदे हप्तेखोरीमुळे बंद होत नाहीत असा मुद्दा उपस्थित करून पोलीस अधिकाऱ्यास जबाबदार धरले. यावर पोलीस अधिकाऱ्याने पुरावे दाखवा असे आव्हान दिले. यामुळे आमदार गुट्टे आणी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरु झाला.
येथिल संत जनाबाई महाविद्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार डाॅ.रत्नाकर गुट्टे यानी गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून अवैध धंद्याना आळा घालावा अशी मागणी केली. तसेच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हप्तावसुली करतात. यामुळे जुगार, गुटखा, दारू यासारखे अवैध धंदे बोकाळले आहेत. हे धंदे बंद करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी जमादारामार्फतची हप्ता वसुली बंद केल्यास तात्काळ अवैध धंदे बंद होतील असे शांतता समितीच्या बैठकीत सागितले.
यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल माने व सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रैणीक लोढा यांनी हप्ता वसुलीचे पुरावे द्या असे विनाकारण आरोप करू नका असे आवाहन केले. आमदार गुट्टे आणि पोलीस अधिकारी लोढा यांच्यात आरोप प्रत्यारोप करत वाद झाला. आमदार गुट्टे यांनी पोलिसांच्या कार्यशैलीवरून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तर खोटे आरोप करू नका पुरावे दाखवा असे म्हणत पोलीस अधिकारी जागेवरचे उठून बोलल्याने बैठकित अवैध धंद्याचा मुद्दा चांगलाच गाजला. शांतता समितीच्या बैठिकीत पोलीस अधिकारी आणि आमदार यांच्यात झालेल्या आरोप प्रत्यारोपाच्या वादाची नागरीकातुन दिवसभर चर्चा झडत होती.