सिंचन विहिरींच्या प्रश्नावर मासिक सभेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:02+5:302021-03-19T04:17:02+5:30
मानवत : येथील पंचायत समितीच्या गुरुवारी झालेल्या मासिक सभेत सिंचन विहिरींच्या प्रश्नांवर सदस्यांनी चांगलाच गदारोळ केला. मासिक सभेला गैरहजर ...
मानवत : येथील पंचायत समितीच्या गुरुवारी झालेल्या मासिक सभेत सिंचन विहिरींच्या प्रश्नांवर सदस्यांनी चांगलाच गदारोळ केला. मासिक सभेला गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मानवत पंचायत समितीच्या सभागृहात १८ मार्चला दुपारी १ वाजता मासिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रभारी गटविकास अधिकारी सुनीता वानखेडे यांचा पदभार १५ मार्चला काढून घेण्यात आल्याने कक्ष अधिकारी मिलिंद मस्के हे सभेचे सचिव होते. यावेळी सभापती प्रमिला उक्कलकर, उपसभापती कमल हिंगे, पं. स. सदस्य दत्तराव जाधव, बंडू मुळे, गंगूबाई जाधव, सुमन गाडे आदींची उपस्थिती होती. या सभेला अनेक अधिकारी गैरहजर असल्याने मुळे यांनी या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. सदस्य दत्तराव जाधव यांनी अधिकारी जाणूनबुजून गैरहजर राहत असल्याचा आरोप केला. गेल्या सहा महिन्यांपासून अधिकाऱ्यांची ही भूमिका कायम आहे. त्यामुळे सिंचन विहिरींचा प्रश्न तसेच पं. स. च्या विविध विभागांतील विकासाचे प्रश्न रेंगाळले आहेत, असा आरोप यावेळी बंडू मुळे यांनी केला. उपसभापती कमल हिंगे यांनी सर्व अधिकारी सभेला हजर असतील तरच मासिक सभेला आम्हाला बोलवा, असे सांगितले. यावेळी सिंचन विहिरींच्या प्रश्नावरून बराच गदारोळ झाला. यावेळी पशुवैद्यकीय, शिक्षण, बांधकाम, आरोग्य विभाग, घरकुल योजना आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.
अधिकाऱ्यांना नोटीस बजावणार
पंचायत समितीच्या होणाऱ्या मासिक सभांना गेल्या ६ महिन्यांपासून विस्तार अधिकारी टी. डी. राठोड यांच्यासह अनेक अधिकारी दौऱ्याच्या नावाखाली गैरहजर राहत आहेत. त्यामुळे पं. स. सदस्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. त्यांची बेफिकिरी आता चालणार नाही. गैरहजर अधिकाऱ्यांना तातडीने नोटिसा बजावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर नोटिसा बजावण्याचा निर्णय घेण्यात आला.
७९ प्रस्तावांच्या फायली धूळखात
तालुक्यातील सिंचन विहिरींच्या १८१ प्रस्तावांना जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी १०२ प्रस्तावांच्या वर्कऑर्डर देण्यात आल्या आहेत. उर्वरित ७९ विहिरींच्या कामाच्या वर्कऑर्डर मिळालेल्या नाहीत. त्यामुळे या फायली धूळखात आहेत. याच विषयांवरून पं. स. सदस्य संतप्त झाले होते.