ग्रामस्थांना पटवून दिले लसीकरणाचे महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:42+5:302021-03-21T04:16:42+5:30
परभणी : ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाचा आलेख वाढविण्यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी शुक्रवारी विविध भागांना भेट ...
परभणी : ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाचा आलेख वाढविण्यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी शुक्रवारी विविध भागांना भेट देऊन ग्रामस्थांना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले आहे. जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लस उपलब्ध केली असून, ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक त्याचप्रमाणे ४५ ते ५९ वर्षे या वयोगटातील गंभीर आजाराच्या रुग्णांना लसीकरण केले जात आहे. मागच्या काही दिवसांपासून या लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे.
नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. त्यांच्या मनात विविध शंका आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी शुक्रवारी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. कोरोनाची लस प्रभावी व परिणामकारक आहे. तेव्हा प्रत्येक नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी आ. रत्नाकर गुट्टे यांचीही उपस्थिती होती. तसेच तालुक्यातील पडेगाव येथे आयोजित केलेल्या आरटीपीसीआर तपासणी शिबिराला ही टाकसाळे यांनी भेट दिली. ग्रामस्थांना त्यांच्याच भाषेत विविध उदाहरणे देऊन टाकसाळे यांनी लसीकरण आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे आवाहन यावेळी केले.