स्वयंपाकाची चव महागली, मसाला दरात दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:22 AM2021-08-21T04:22:16+5:302021-08-21T04:22:16+5:30

विविध मसाल्यांचे दर मागील चार-पाच दिवसांमध्ये वाढले आहेत. शहरात गुजरी बाजार, गांधी पार्क, देशमुख गल्ली, क्रांती चौक येथे खुल्या ...

Cooking tastes expensive, spice prices double | स्वयंपाकाची चव महागली, मसाला दरात दुप्पट वाढ

स्वयंपाकाची चव महागली, मसाला दरात दुप्पट वाढ

googlenewsNext

विविध मसाल्यांचे दर मागील चार-पाच दिवसांमध्ये वाढले आहेत. शहरात गुजरी बाजार, गांधी पार्क, देशमुख गल्ली, क्रांती चौक येथे खुल्या मसाल्यांची ३० ते ४० दुकाने आहेत. मिरची कांडप तसेच हळद आणि भाजीचा विशेष मसाला बनविणाऱ्या विक्रेत्यांना कच्च्या मालाचे दर वाढल्याने फटका बसला आहे. यामुळे महिलावर्गही मसाले खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. मात्र, मसाल्याशिवाय चव येत नसल्याने मिळेल त्या भावामध्ये कमीतकमी मसाला विकत घेऊन जिभेचे चोचले पूर्ण केले जात आहेत.

येथून येतो माल

परभणी शहरात मसाल्याचे विविध पदार्थ हैदराबाद येथून येतात. तर तेथे कच्चा माल परदेशातून येतो. ज्यात अफगाणिस्तानचा समावेश आहे. राज्यातील अकोला, लातूर, जालना येथून उर्वरित मसाले आणले जातात. मागील काही दिवसांत बदललेले वातावरण आणि वाढलेले दर यामुळे व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणानंतर परभणीत येणाऱ्या ड्रायफ्रूटचे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले, तर ड्रायफ्रूट आणि मसाले यांचा अजून १० दिवस पुरेल इतका साठा शिल्लक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

असे वाढले दर

रामपत्री १०० १५० (छटाक)

बदामफूल ३०० ४०० (किलो)

जिरे १०० २०० (किलो)

काळी मिरी ४५० ५०० (किलो)

नाकेसर १५०० १७०० (किलो)

जुने दर नवे दर

महागाई पाठ सोडेना...

मागील वर्षीपेक्षा सध्याचे मसाल्याचे दर दुपटीने वाढले आहेत. वर्षातून एकदाच मिरचीपूड, हळदीचे कांडप करून सर्व मसाला विकत घेतला जातो. हा मसाला तयार करून घेण्यासाठी वेगळे पैसे लागतात. गॅस महाग झाला त्यात भाजी महागली आता मसालेही महाग झाल्याने बजेट कोलमडले आहे. - ऋतुजा मालेवार, गृहिणी

मसाले व स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील सर्वच वस्तू महागल्या आहेत. यामुळे महिन्याकाठी स्वयंपाकाचा खर्च वाढला आहे. - स्मिता डावरे, गृहिणी

म्हणून वाढले मसाल्याचे दर

गेल्या एक वर्षात मसाल्याच्या अनेक पदार्थांच्या आयातीवर परिणाम झाला. टर्कीसह इतर देशातून येणारे बदामफूल, रामपत्री, खसखससारख्या मसाल्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. अजूनही नागरिक व महिला बाजारात मिळणाऱ्या विविध कंपन्यांच्या मसाल्यापेक्षा स्वतः मसाल्याचे पदार्थ बनवून घेतात. - प्रशांत कौलवार, व्यापारी

Web Title: Cooking tastes expensive, spice prices double

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.