कोरोनामुळे होऊ शकते किडनीचे नुकसान; लक्षणांकडे लक्ष देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:13 AM2021-06-17T04:13:15+5:302021-06-17T04:13:15+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला आहे. अनेक रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले असून, ते आता सर्वसामान्य जीवन जगत आहेत. मात्र, ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला आहे. अनेक रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले असून, ते आता सर्वसामान्य जीवन जगत आहेत. मात्र, काही जणांना विविध प्रकारचे आजार जाणवत आहेत. मानसिक तणाव, मधुमेहाची लक्षणे जाणवणे तसेच काही रुग्णांमध्ये किडनीची लक्षणेही जाणवत आहेत. किडनीचा आजार हा गंभीर आजार असून, या आजाराची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे आहे.
किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास
जर कुणास आधीपासूनच किडनी संदर्भाने समस्या आहेत, असा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्या रुग्णाने पूर्वीच्या औषधींची माहिती संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. तसेच किडनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील औषधे घेण्याची गरज आहे.
हे करा...
सर्वसामान्यपणे नागरिकांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर किमान एक महिनाभर आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या नियमित करणे गरजेचे आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर काही लक्षणे आढळत असतील तर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. मधुमेह रक्तदाब यासारख्या तपासण्या नियमितपणे केल्या पाहिजेत.
हे करू नका
कोरोनातून बरे झाल्यानंतर पूर्वीप्रमाणेच धावपळ करू नये.
कोरोनाकाळात झालेला उपचार किडनीतज्ज्ञांपासून लपवून ठेऊ नये.
बरे झाल्यानंतर आपल्या शारीरिक तपासण्यांकडे दुर्लक्ष करू नये.
औषधींसह संतुलित आहाराकडे दुर्लक्ष करू नये
मधुमेहाचे रुग्ण आणि वयोवृद्ध नागरिक यांना किडनी संदर्भाने काही लक्षणे जाणवत असतील तर नियमित जीएफआर तपासून घ्यावा. जीएफआर ३० पेक्षा कमी असेल तर तज्ज्ञांशी सल्ला घेऊन कोरोना औषधोपचार करावा.
डॉ. रूपेश नगराळे