कोरोनामुळे अर्थकारण बदलले; हाताला काम नसल्यामुळे श्रमिकांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 05:55 PM2020-09-12T17:55:50+5:302020-09-12T17:57:13+5:30
मोर्चा, दिंडी, शालेय उपक्रमांचा शनिवार बाजार हा साक्षीदार असला तरी श्रमिकही याच ठिकाणावरुन आपल्या कामाला सुरुवात करतात.
परभणी : शहरातील शनिवार बाजारात आठवड्याला पालेभाज्यांचा बाजार भरत असला तरी दररोज सकाळी सहा ते अकरा या वेळेत येथे श्रमीक (मजूर) कामाच्या अपेक्षेने हजेरी लावतात. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यांपासून त्यांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली ंआहे.
मोर्चा, दिंडी, शालेय उपक्रमांचा शनिवार बाजार हा साक्षीदार असला तरी श्रमिकही याच ठिकाणावरुन आपल्या कामाला सुरुवात करतात. मागील तीस वर्षापासून दररोज सकाळी सहा ते अकरा या वेळेत दोनशे ते तीनशेमजूर या ठिकाणी उभे राहून मिळेल ते काम उपलब्ध होईल का याची प्रतिक्षा करोत असतात. या श्रमिकांमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. कुदळ, फावडे, खुरपे, टोपले, पहार आदी साहित्य त्य्प्या समोबत असते. मागील पाच महिन्यांपासून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडल्याने या श्रमिकांच्या हाताला काम मिळेना झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एखादा अनोळखी व्यक्ती सकाळच्या वेळी बाजारात आला की, त्याच्या भोवती श्रमीक गोळा होतात. काय काम आहे?, कुठे जायचे, कोणते काम करायचे? असा प्रश्नांचा भडीमार करतात. यावर काम मिळाले आनंदी होतात नाही तर निराश होऊन जागेवर जावून उभे राहतात. हे चित्र नित्याचे झाले आहे.
‘जिल्हा प्रशासनाने कामे उपलब्ध करुन करावीत’
मागील पाच महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे या श्रमिकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोनशे ते तीनशे हातात मिळणारी रोजंदारी ती पण कोरोना आजारामुळे मिळत नाहीत. जिल्हा प्रशासनाने श्रमिकांना काम उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी शेख मुन्ना, सय्यद इरफान, शेख इस्माईल, शेख इरफान, अशोक गुंजकर, विशाल कांबळे, सय्यद जावेद, अमीर खान यांनी केली आहे.
आजवर अशी वेळ कधी आली नव्हती
शनिवार बाजाराच्या ठिकाणाहून हमखास काम मिळते म्हणून भल्या पहाटे उठून सकाळी सहा वाजता येथे अनेक जण येतात. सकाळी अकरा पर्यंत ठिकाणी ते थांबतात. काम मिळाले तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो नाही तर निराश होऊन सोबत आणलेले साहित्य परत डोक्यावर घेऊन घरी परतात. आजवर उपाशी राहण्याची वेळ कधी आली नव्हती, ती आज कोरोनाच्या संसर्गामुळे आमच्यावर आली आहे.
- सय्यद जावेद, श्रमिक