कोरोना डेथ ऑडिट; ६४ टक्के रुग्णांचा ७२ तासांत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:13 AM2021-06-18T04:13:34+5:302021-06-18T04:13:34+5:30
परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे दवाखान्यात दाखल झालेल्या ७८१ रुग्णांचा ७२ तासांत मृत्यू झाला आहे. हे प्रमाण एकूण मृत्यूच्या ...
परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे दवाखान्यात दाखल झालेल्या ७८१ रुग्णांचा ७२ तासांत मृत्यू झाला आहे. हे प्रमाण एकूण मृत्यूच्या ६४.४४ टक्के एवढे आहे. विशेष म्हणजे, मृत पावलेल्या बहुतांश रुग्णांना पूर्वीपासूनच व्याधी होती.
कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात १ हजार २१२ रुग्णांच्या मृत्यूचे विश्लेषण आरोग्य विभागाने केले आहे. ७८१ रुग्णांचा मृत्यू कोरोना झाल्याने दवाखान्यात दाखल झाल्यानंतर ७२ तासांत झाला आहे. हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचप्रमाणे २१३ रुग्णांचा दवाखान्यात दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच मृत्यू झाला. १११ रुग्णांचा मृत्यू हा २४ ते ४८ तासांत झाला आहे. तर ४८ ते ७२ तासांत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १०७ एवढी आहे.
कोरोनाने मृत्यू झालेल्या या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांना पूर्वी सहव्याधी असल्याचेही पुढे आले आहे. तर अनेक रुग्ण कोरोनाची लागण झाल्यानंतर उशिराने दवाखान्यात दाखल झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची बाबही पुढे येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या लाटेत निष्काळजीपणा झाल्यानेही अनेकांवर मृत्यू ओढावल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या मृत्यूच्या विश्लेषणानंतर समोर येत आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण निम्मे
कोरोना झाल्यानंतर दवाखान्यात दाखल झालेल्या ७८१ रुग्णांचा मृत्यू ७२ तासांत झाला आहे. मृत्यू पावलेल्या या रुग्णांमध्ये ५३५ पुरुष, तर २४६ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १२१२ रुग्णांच्या मृत्यूचे आरोग्य विभागाने विश्लेषण केले आहे. त्यात ८०४ पुरुष आणि ४०८ महिला रुग्णांचा समावेश आहे. तर दवाखान्यात दाखल झाल्यानंतर २४ तासांत मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ८५ महिला रुग्णांचा समावेश आहे.
मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण
कोरोना संसर्ग काळ मधुमेही रुग्णांसाठी सर्वाधिक धोकादायक काळ ठरला आहे. कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये मधुमेह असलेल्या रुग़्णांचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
मधुमेह असलेल्या रुग़्णांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातच कोरोनाची लागण झाल्याने कोरोना काळात या रुग्णांना औषधी आणि ऑक्सिजन लागण्याचे प्रमाण अधिक राहिले.
त्याचप्रमाणे हृदयरोग, रक्तदाब, कर्करोग यासारख्या आजाराच्या रुग्णांसाठीही कोरोना संसर्ग अधिक धोकादायक ठरला आहे.
बालकांचे प्रमाण अत्यल्प
कोरोनाने मृत्यू झालेल्या बालकांचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. ० ते १० वर्षे वयोगटातील पाच बालकांचा आतापर्यंत मृत्यू झाला.