कोरोनाने मृत्यू : २ कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:13 AM2021-06-26T04:13:43+5:302021-06-26T04:13:43+5:30
कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत ५० लाखांचे विमा संरक्षण लागू करण्यात ...
कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत ५० लाखांचे विमा संरक्षण लागू करण्यात आले होते. या कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना ५० लाखांची विम्याची रक्कम देण्याचा हा निर्णय आहे. परभणी जिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून संघरत्न अश्रोबा खिल्लारे हे कार्यरत होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा ४ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा रुग्णालयातच उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिका नंदा दत्तात्रय सूर्यवंशी यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा १६ सप्टेंबर २०२० रोजी उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या वारसांना पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत घोषित करण्यात आलेली विम्याची ५० लाखांची मदत देण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे जिल्हा प्रशासनाकडून सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी देण्यात आल्याचे पत्र राज्याच्या आरोग्य सहसंचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्यामुळे दोन्ही मयत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखांची विम्याची रक्कम मिळणार आहे.