वर्षपूर्तीपूर्वीच पुन्हा उफाळला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:16 AM2021-03-15T04:16:28+5:302021-03-15T04:16:28+5:30
परभणी : मागील वर्षी पहिला कोरोना रुग्ण आढळल्याच्या घटनेला अद्याप एक वर्ष पूर्ण होत नाही तोच जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच्या ...
परभणी : मागील वर्षी पहिला कोरोना रुग्ण आढळल्याच्या घटनेला अद्याप एक वर्ष पूर्ण होत नाही तोच जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच्या संसर्गाने उफाळी घेतल आहे. त्यामुळे या कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत.
जिल्ह्यात गतवर्षी १६ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण परभणी शहरात नोंद झाला. त्यानंतर, जिल्हावासीयांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली होती. त्यानंतरच्या काळात एक-एक करीत प्रत्येक महिन्यांत रुग्णांची संख्या वाढत गेली. कोरोनाचा पहिला रुग्ण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बरा होऊन घरी परतला. मात्र, कोरोनाचा सुरू झालेला हा संसर्ग मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरूच राहिला. ऑक्टोबरनंतर मात्र रुग्णांची संख्या कमी होत गेली. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यापर्यंत रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. त्यामुळे कोरोनापासून सुटका झाल्याचा आनंद नागरिकांच्या मनात असतानाच फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आता तर दररोज ४० ते ५० नवे रुग्ण नोंद होत आहेत. त्यामुळे मागील वर्षी जिल्ह्यात आढळलेला पहिला रुग्णाची वर्षपूर्ती होण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाच जिल्हावासीयांना पुन्हा कोरोनाचा प्रतिकार करावा लागत आहे.
पुरेसा औषधीसाठा उपलब्ध
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली असली, तरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पुरेशा प्रमाणात औषधींचा साठा प्रशासनाने उपलब्ध करून ठेवला आहे. विशेष म्हणजे, ऑक्सिजन सिलिंडर आणि इतर आवश्यक त्या उपाययोजनाही करून ठेवल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना औषधींचा कोणताही तुटवडा निर्माण होईल, अशी परिस्थिती सध्या तरी नाही. प्रशासनाने रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी करून ठेवली आहे.
कोविड केअर सेंटरही वाढविले
मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केले होते, तसेच शहरातही तीन कोविड केअर सेंटर सुरू केले होते. मध्यंतरी हे केंद्र बंद करण्यात आले. मात्र, आता पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी केली जात आहे. परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालय आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून, तालुक्याचे केंद्रही टप्प्या-टप्प्याने सुरू केले जाणार आहे.
पहिला रुग्ण जिल्ह्याबाहेर
मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात जिल्ह्यात पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती. हा रुग्ण पुणे येथून परभणीत आला होता. तोही जिल्ह्याबाहेरचा रहिवासी आहे. परभणीत कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर, येथील आरोग्य यंत्रणेने त्याच्यावर यशस्वी उपचार करून त्याला कोरोनामुक्त केले. त्यानंतर, हा रुग्ण शेजारच्या हिंगोली जिल्ह्यात असलेल्या गावाकडे परतला आहे. त्यामुळे या रुग्णाविषयी अधिकच माहिती मिळू शकली नाही.