रेल्वेस्थानकावर कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:26 AM2021-02-23T04:26:29+5:302021-02-23T04:26:29+5:30
नळ जोडण्यांना मिळेना गती परभणी : शहरात नळ जोडण्याची संख्या अद्यापही वाढलेली नाही. नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होऊन ...
नळ जोडण्यांना मिळेना गती
परभणी : शहरात नळ जोडण्याची संख्या अद्यापही वाढलेली नाही. नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होऊन आता एक वर्षाचा कालावधी उलटला आहे; मात्र नागरिक या योजनेवर नळ जोडणी घेत नसल्याने पालिकेचे पाणी वाटपाचे नियोजन कोलमडत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येलदरी प्रकल्पात पुरेसा पाणी साठा उपलब्ध असतानाही परभणीकरांना मात्र आठ ते दहा दिवसांतून एक वेळा पाणी पुरवठा होत आहे.
रस्त्याच्या कडेला पुन्हा खोदकाम
परभणी : येथील वसंतराव नाईक पुतळा ते सुपर मार्केट या रस्त्यावर जलवाहिनी टाकण्यासाठी पुन्हा एकदा खोदकाम केले जात आहे. शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे काम सुरू झाले आहे. राजगोपालाचारी उद्यानातील पाण्याची टाकी सुरू करण्यात आली असून, या टाकीवरून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकली जात आहे. त्या अंतर्गत हे खोदकाम केले जात आहे.
बसस्थानकावरील प्रवाशांची गर्दी कायम
परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने केले जात असले तरी बसस्थानकावरील प्रवाशांची गर्दी मात्र काही केल्या कमी होत नाही. प्रवाशांनी फुल्ल होऊन बसगाड्या धावत असून, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. महामंडळ प्रशासनाने क्षमतेपेक्षा निम्मे प्रवासी घेऊनच प्रवास सुरू करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
पूल बनला धोकादायक
परभणी : शहरातील विद्यापीठ भागातील पूल धोकादायक बनला आहे. या पुलाला दोन्ही बाजूला कठडे नाहीत. त्याचप्रमाणे रस्त्यावर खड्डे झाल्याने किरकोळ अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यापीठ परिसरातून पलीकडील बाजूस असलेल्या गावांतील अनेक ग्रामस्थ प्रवास करतात. तेव्हा विद्यापीठ प्रशासनाने या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
परभणी : येथील नारायणचाळ भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. या मार्गावर आधीच वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच खड्डे वाढल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली असून, रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
बाजारपेठेत विरुद्ध मार्गाने वाहतूक
परभणी : शहरातील बाजारपेठ भागात सर्रास विरुद्ध मार्गाने वाहतूक केली जात आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीचा खोळंबा नित्याचा झाला आहे. एकेरी वाहतुकीच्या रस्त्यांवरून दोन्ही बाजूने वाहतूक होत असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी करून विरुद्ध मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.