शिक्षक विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:20 AM2021-03-01T04:20:17+5:302021-03-01T04:20:17+5:30
परभणी : जिल्ह्यातील शिक्षकांसह दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणी कोरोना चाचण्या ...
परभणी : जिल्ह्यातील शिक्षकांसह दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणी कोरोना चाचण्या करण्यासाठी केंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्रांवर जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णसंख्याही काही प्रमाणात वाढली आहे.
बिजोत्पादनासाठी सोयाबीन लागवड
परभणी : मागील वर्षी सोयाबीनचे बियाणे अपुरे पडल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. ही परिस्थिती पुढील हंगामात निर्माण होऊ नये, यासाठी अनेक भागांत उन्हाळी सोयाबीनची लागवड केली जात आहे. तालुक्यातील माळसोन्ना येथील प्रगतीशील शेतकरी गजानन दहे यांनीही तीन एकरमध्ये उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. सध्या हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे.
बसपोर्टच्या कामाला लागेना मुहूर्त
परभणी : येथील बसस्थानक परिसरात बसपोर्ट उभारणीचे काम दोन वर्षापूर्वी हाती घेण्यात आले. मात्र महामंडळ प्रशासनाकडून कंत्राटदाराची देयके वेळेत अदा केली जात नसल्याने काम ठप्प आहे. विशेष म्हणजे या कामासाठी स्थानिकाची जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन कामही ठप्प आणि जुनी इमारतही राहिली नसल्याने प्रवाशांची मात्र तारांबळ होत आहे.
शहरी भागात रस्त्याचे काम
परभणी : गंगाखेड-परभणी या रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. आठ दिवसांपासून शहराच्या हद्दीत काम सुरू करण्यात आले असून, एका बाजूच्या रस्त्याचे सिमेट काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरील पिंगळगड नाल्यावर असलेल्या पुलाचे कामही हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी नाला परिसरामध्ये पर्यायी रस्ता तयार करून वाहनधारकांची गैरसोय दूर करण्यात आली आहे. पुलाच्या कामामुळे मागील अनेक वर्षांपासूनची गैरसोय दूर होणार आहे.
स्वॅब तपासणी केंद्र बंद
परभणी : बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यासाठी मागील आठवड्यात रेल्वेस्थानकावर केंद्र निर्माण केले होते. मात्र दोन दिवसांपासून सायंकाळनंतर या केंद्रावर एकही कर्मचारी उपस्थित नसतो. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे नागरिक विना तपासणी शहरात प्रवेश करीत आहेत. रेल्वेस्थानकावर २४ तास स्वॅब तपासणी केंद्र सुरू ठेवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.