कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:13 AM2021-06-24T04:13:59+5:302021-06-24T04:13:59+5:30
कोरोनाचे लसीकरण केल्यानंतर प्रत्येक नागरिकाला केंद्रावर अर्धा तास थांबणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्रांच्या परिसरात स्वतंत्र खोलीही ...
कोरोनाचे लसीकरण केल्यानंतर प्रत्येक नागरिकाला केंद्रावर अर्धा तास थांबणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्रांच्या परिसरात स्वतंत्र खोलीही तयार केली आहे. मात्र, अनेक नागरिक मला काही होत नाही, या आविर्भावात केंद्रावर न थांबता लस घेतल्यानंतर थेट निघून जातात. अशा नागरिकांना घरी गेल्यानंतर काही त्रास झाला तर तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने लस घेतल्यानंतर केंद्रावर किमान अर्धा तास थांबणे बंधनकारक आहे.
लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी
लस घेतल्यानंतर काही जणांमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता असते. ही शक्यता खूप कमी असली तरी अशी काही लक्षणे आढळल्यास लस घेतलेल्या नागरिकास आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अद्रीनॅलिन हे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकाचा जीव वाचू शकतो.
लस हेच औषध
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. लस हेच कोरोनावर औषध आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली तरी त्या नागरिकास धोका कमी असतो. त्यामुळे लसीशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रांवर तीन कक्ष केले आहेत. त्यातील एक कक्ष लस घेतल्यानंतर नागरिकास थांबण्यासाठीचा आहे. याठिकाणी प्रत्येकाला अर्धा तास आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली थांबणे आवश्यक आहे. त्याचे पालनही करणे गरजेचे आहे.
डॉ. रावजी सोनवणे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी.