कोरोना लसीकरणास पुन्हा गती येणार; नाकावाटे घेण्याच्या 'इन्कोव्हॅक' लसीचा बुस्टर मिळणार
By राजन मगरुळकर | Published: April 25, 2023 06:28 PM2023-04-25T18:28:22+5:302023-04-25T18:28:44+5:30
राज्यात कोविडच्या रुग्णांची वाढती संख्या, मृत्यू प्रमाण पाहता ही लस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
परभणी : आरोग्यसेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कोविड लसीकरणाबाबत झालेल्या बैठकीमध्ये राज्य शासनामार्फत कोविड लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लसीची खरेदी केली जाणार आहे. त्यानुसार सर्व जिल्हास्तरावर, महापालिका स्तरावर या लसींचे वितरण आगामी काही दिवसांत केले जाणार आहे. त्यामुळे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये लागलेल्या लसीकरणाच्या ब्रेकला आता पुन्हा गती प्राप्त होणार आहे. याबाबत राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणेच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.
कोविड लसीकरण कार्यक्रमात नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लसीच्या वापराबाबत आरोग्य सेवा आयुक्त यांनी दि. १८ एप्रिलला बैठक घेतली. यामध्ये विविध जिल्ह्यात, महापालिका स्तरावर लसीकरण कार्यक्रमांतर्गत इन्कोव्हॅक लस पुरवठा करण्याचे नियोजन लवकरच केले जाणार आहे. राज्यात कोविडच्या रुग्णांची वाढती संख्या, मृत्यू प्रमाण पाहता ही लस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
साठ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य
इन्कोव्हॅक लसीचा पुरवठा सर्व जिल्ह्यांना झाल्यानंतर साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोससाठी ही लस वापरली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी याचे प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय ही लस १८ वर्षांवरील सर्व वयोगटांना दिली जाणार आहे. यामध्ये एकूण दोन डोस दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक डोसमध्ये २८ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
लवकरच होणार पुरवठा
या लसीची राज्यातील सर्व जिल्ह्यातील मागणी नोंदवून त्याप्रमाणे त्याचा पुरवठा करण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन केले जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प., जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय आरोग्य अधिकारी महापालिका यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
अशी दिली जाणार इन्कोव्हॅक लस
शासनाच्या नव्या सूचनेनुसार ही लस बूस्टरसाठीच नव्हे तर पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राहणार आहे. ज्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नाही, अशांनाही कोविडपासून संरक्षणासाठी लस देण्यात येणार आहे. लसीचे चार चार थेंब नाकपुडीमध्ये टाकण्यात येतील. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी पुन्हा दुसरा डोस घ्यावा लागेल. यानंतर सहा महिन्यांनी हाच डोस बूस्टर डोस म्हणून दिला जाणार आहे.
परभणी जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी
एकूण लोकसंख्या - २० लाख ८९ हजार ४३९
बारा वर्षांवरील लसीकरण उद्दिष्ट - १७ लाख दोन हजार ८१५
पहिला डोस - १३ लाख ४३ हजार ६४७ (८७.९१ टक्केवारी)
दुसरा डोस - दहा लाख ४४ हजार २९८ (६१.३३ टक्केवारी)
प्रिकॉशन डोस - ९८ हजार ५४२ (५.७९ टक्के)