Corona virus :लॉकडाऊनमुळे दुग्ध उत्पादक अडचणीत; हजारो लिटर दुध शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 07:55 PM2020-03-29T19:55:22+5:302020-03-29T19:55:59+5:30
कोरोनाचा परिणाम दुग्ध व्यवसायावर
परभणी : जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, खाद्य पदार्थ बनविणारे स्वीटमार्ट बंद असल्याने त्याचा फटका दूध व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात दुधाची आवक वाढली असून हजारो लिटर दूध शिल्लक रहात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या उद्देशाने २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून परभणीत येणारे दुधाची आवक थांबली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यता दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. परभणी शहरासह प्रमुख मोठे हॉटेल्स आणि चहा बनविणाºया छोट्या हॉटेल्समध्ये दररोज हजारो लिटर दुधाची विक्री होत होती. मात्र आठवडाभरापासून हे हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे हॉटेल्स आणि गोड पदार्थ बनविणा-या स्वीट मार्ट दुकानांसाठी लागणा-या दुधाची विक्री ठप्प झाली आहे.
शिल्लक राहिलेले हे दुध परभणीतील शासकीय मध्यवर्ती दुग्ध शाळेला प्राथमिक सहकारी संस्थेमार्फत दिले जात आहे. त्यामुळे जिल्हा दुग्ध शाळेच्या दूध संकलनात वाढ झाली आहे.
सर्वसाधारणपणे जिल्ह्यात दररोज ५ हजार ३७५ लिटर दुधाची आवक होते. मात्र संचारबंदी लागू झाल्याने दुधाची आवक वाढली आहे. २९ मार्च रोजी ११ हजार ५०६ लिटर दुधाचे संकलन झाले आहे. या संकलना व्यतिरिक्तही हजारो लिटर दूध शिल्लक राहिले असून, या दुधाची नासाडी होत असल्याने दूध उत्पादक अडचणीत आले आहेत.
१४० मे. टनाने घटली फळांची आवक
जिल्ह्यातील फळे आणि भाजीपाल्यालाही संचारबंदीचा फटका बसला आहे. जिल्हाभरात सर्वसाधारपणे दररोज १६० मे. टन फळांची आवक होते. ही सर्व फळे परजिल्ह्याच्या जिल्ह्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी येतात. मात्र वाहतूक आणि मोठ्या बाजारपेठाही बंद असल्याने या फळांची आवक घटली आहे. रविवारी २० मेट्रीक टन फळांची आवक झाली आहे. सुमारे १४० मे. टन फळांची आवक घटल्याने व्यावसायिकांना फटका सहन करावा लागला आहे.फळांप्रमाणेच भाजीपाल्याची आवकही १० मे.टनाने घटली आहे. दररोज ३० मे. टन भाजीपाल्याची आवक होते. मात्र रविवारी केवळ २० मे. टन भाजीपालाच जिल्ह्याच्या बाजारपेठेत दाखल झाला. त्यामुळे कोरोनाचा परिणाम दुध उत्पादकांबरोबरच फळ आणि भाजी विक्रेत्यांनाही बसला आहे.