कोरोना योद्धेच वेतनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:18 AM2021-01-25T04:18:03+5:302021-01-25T04:18:03+5:30
परभणी : कोरोनासारख्या संकटाच्या काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन ...
परभणी : कोरोनासारख्या संकटाच्या काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन अधिपरिचारिकांना सहा महिन्यांपासून आरोग्य विभागाने वेतनच अदा केले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून अधिपरिचारक, अधिपरिचारिका काम करतात. येथील जिल्हा रुग्णालयात १०० हून अधिक अधिपरिचारिका कार्यरत आहेत. सद्य:स्थितीला डॉक्टर्ससह अधिपरिचारिकाही कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योद्ध्याप्रमाणे सहभागी आहेत. या योद्ध्यांच्या कार्याबाबत देशभरात कृतज्ञता व्यक्त होत असतानाच राज्य शासनाने बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या मानधनाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला. ४० हजार रुपयांवर काम करणाऱ्या या अधिपरिचारिकांना एप्रिल महिन्यापासून थेट २५ हजार रुपयांवर काम करावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. कोरोना लढ्यात स्वत:ला झोकून सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याऐवजी शासनाने नाउमेद केले आहे. त्यातही सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या एक अधिपरिचारक, एक अधिपरिचारिका व एक वैद्यकीय अधिकारी या तिघांचे मागील सहा महिन्यांपासून वेतन झालेले नाही. त्यामुळे या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आरोग्य उपसंचालक औरंगाबाद, जिल्हा शल्यचिकित्सक परभणी यांच्यासह आरोग्य विभाग प्रशासनाकडे वेतन मिळावे, यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र यांच्या वेतनासाठी अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. विशेष म्हणजे सहा महिन्यांच्या बंधपत्रावर काम करणाऱ्या एका अधिपरिचारकाची सहा महिन्यांची सेवाही संपली आहे. मात्र त्याला अद्यापपर्यंत आरोग्य विभागाने एक रुपयाचेही वेतन दिलेले नाही. त्यामुळे तत्काळ वेतन अदा करावे, अशी मागणी या कोरोना योद्ध्यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.
एकीकडे सन्मान, दुसरीकडे खच्चीकरण
जिल्हा रुग्णालय व त्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कोरोनावर मात करण्यासाठी धडपडत आहेत. नियमित आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच बंधपत्रित अधिपरिचारिकाही योद्ध्याप्रमाणे सेवा देत आहेत. कोरोना लढ्यात लढणाऱ्या या योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था, राज्य शासन पुढे येत आहे तर दुसरीकडे सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह अधिपरिचारक व अधिपरिचारिकेचे वेतन मागील सहा महिन्यांपासून न दिल्याने त्यांचे खच्चीकरण केले जात असल्याचा प्रकार सुरू आहे. दरम्यान, केवळ डीडीओ कोडअभावी हे वेतन अदा न झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.