मतदानावरून परतल्यानंतर कोरोनाच्या चाचणीला फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:15 AM2021-01-18T04:15:26+5:302021-01-18T04:15:26+5:30
परभणी : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी थांबलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची परतल्यानंतर कोरोना चाचणी झाली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चलबिचल ...
परभणी : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी थांबलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची परतल्यानंतर कोरोना चाचणी झाली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चलबिचल दिसून येत आहे.
जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ४९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हास्तरावरून अनेक कर्मचारी ग्रामीण भागात मतदानप्रक्रिया पार पाडण्यासाठी पोहोचले. सकाळी ७.३० वाजेपासून ते ५.३० वाजेपर्यंत हे कर्मचारी अनेक नागरिकांच्या संपर्कात आले. त्यामुळे निवडणुकीहून परतल्यानंतर कर्मचाऱ्यांची कोरोनाचा चाचणी करणे बंधनकारक होते. मात्र जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारची चाचणी झाली नाही. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह उमेदवारांचीही कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना होत्या. मात्र त्याकडेही फारासे गांभीर्याने पाहण्यात आले नाही. आठ हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी २५ टक्के उमेदवारांच्याच चाचण्या करण्यात आल्या. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तर निवडणुकीपूर्वीही चाचण्या झाल्या नाहीत. आणि निवडणूक पार पडल्यानंतरही या चाचण्या करण्यात आल्या नाहीत. काही लक्षणे आढळली तर स्वत:च चाचणी करून घेऊन असे मत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. परंतु, प्रशासनाने मात्र या चाचण्या न केल्याचे समोर आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर परतलेल्या काही कर्मचाऱ्यांनी स्वत:हूनच आरोग्याची काळजी घेण्याचे ठरविले आहे. या कर्मचाऱ्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने काळजी करण्याचे कारण नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने त्याकडे काणाडोळा केला.