coronavirus : पुण्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात होते गंगाखेडचे ११ जण; सर्वजण निगराणीखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 06:44 PM2020-04-02T18:44:23+5:302020-04-02T18:46:59+5:30
. एकाच गावातील अकरा जण संशयित आढळल्याने खळबळ
गंगाखेड: पुणे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तालुक्यातील एकाच गावातील अकरा जणांना संशयित म्हणून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात व एकास सेलू येथील रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. एकाच गावातील अकरा जण संशयित आढळल्याने खळबळ उडाली आहे.
गंगाखेड तालुक्यातील रहिवाशी असलेली एक व्यक्ती नौकरीनिमित्त पुणे येथे राहत आहे. कोरोना विषाणूंची लक्षणे दिसून आल्याने पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या या व्यक्तीस कोरोना विषाणूंचा बाधा झाल्याची माहिती दि. २२ मार्च रविवार रोजी केलेल्या तपासणीतुन समोर आली. कोरोना विषाणूंची बाधा झाल्याने सध्या त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेली ही व्यक्ती दि. १३ मार्च ते दि. १५ मार्च दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण नाथशष्टी यात्रेत सहभागी झाली होती. यावेळी नातेवाईक असलेले गंगाखेड तालुक्यातील एकाच गावातील अकरा जण त्यांच्या संपर्कात आले होते.
यावरून आरोग्य विभागाने बुधवारी संबंधित गावात जाऊन रुग्णाच्या संपर्कात आलेली नऊ जण व दिल्ली येथील निझामुद्दीन येथून परतलेल्यांच्या संपर्कात आलेल्या एकास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे, डॉ. वसीम खान, डॉ. राजकुमार गिते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रवीण जायभाये, ज्ञानेश्वर गुट्टे, शेख खाजा यांनी एकूण अकरा जणांचे स्वब नमुने घेत तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविले आहे.
दरम्यान, यातील एकास सेलू येथील रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. यापूर्वी पूर्वी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या सर्वच बारा संशयितांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने समाधानी असलेल्या आरोग्य प्रशासनात बुधवार व गुरुवार रोजी सापडलेल्या अकरा संशयितांमुळे मात्र खळबळ उडाली आहे.