Coronavirus : दुबई, लंडन ते फ्रांस; १८ देशातून परभणी जिल्ह्यात आले ५६ नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 08:55 PM2020-03-29T20:55:22+5:302020-03-29T20:57:27+5:30
राज्य शासनाला अहवाल सादर
परभणी : राज्यासह देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना या आजाराची धास्ती प्रशासनानेही घेतली असून १ मार्चपासून आतापर्यंत परदेशातून जिल्ह्यात दाखल झालेल्या व्यक्तींची माहिती राज्य शासनाने मागविली आहे़ या माहिती संबंधित व्यक्ती कोरोना बाधित आहे का? यापासून ते त्याच्या कायमस्वरुपी पत्त्यासह संपर्क क्रमांकाची माहितीही मागविण्यात आली आहे़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने एकूण ५६ जणांची यादी राज्य शासनाकडे पाठविली आहे़
कोरोनाचा रुग्ण महाराष्ट्रात आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणास सतर्क झाली आहे़ कोरोनाचा प्रादुर्भाव परदेशी नागरिकांपासूनच होण्याची शक्यता असल्याने परदेशातून येणाºया नागरिकांची माहिती घेण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली़ व्यावसायिक कामाच्या निमित्ताने, पर्यटनच्या निमित्ताने जिल्ह्यातून विदेशात जाणाºया नागरिकांची संख्या वाढली आहे़ हे नागरिक पुन्हा स्वगृही परत येत असताना त्यांच्यासोबत कोरोनाचा संसर्गही होवू नये, या उद्देशाने या सर्व नागरिकांची आरोग्य विभागाने तपासणी केली़ दोन आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिकार केला जात आहे़ त्याच पार्श्वभूमीवर राज्य शसनाने परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती मागविली आहे़ ही माहिती देत असताना नागरिकाचे नाव, त्याचा पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आणि कोणत्या देशातून आला याची मागविण्यात आली आहे़ त्याच प्रमाणे संबंधित व्यक्तीला काही त्रास होत असेल तर कोणत्या दवाखान्यात दाखल आहे? त्या दवाखान्यातून उपचार घेवून डिस्चार्ज मिळाला असेल तर त्याचा दिनांक तसेच परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या आरोग्याचा अहवाल या बाबतची माहिती मागविण्यात आली आहे़
प्रशासनाच्या या पत्रानुसार जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना जिल्ह्यातील ही सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे़ १८ विविध देशातून ५६ नागरिक परभणीत दाखल झाले असून, त्यात सर्वाधिक दुबईमधून आलेल्या १२ नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती राज्य शासनाकडे पाठविली आहे,असे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ़ संजय कुंडेटकर यांनी सांगितली़
कोणत्या देशातून आले किती नागरिक
शारजाह : १
फिलिपाईन : २
दुबई : १२
जपान : २
अबूधाबी : ३
बेल्जीयम : १
कतार : २
मास्को : ४
रशिया : २
सौदी अरेबिया : ८
कुवैंत : १
बेहरीन : ३
कझागीस्तान : ५
अमेरिका : ६
आॅस्ट्रेलिया : १
युगांडा : १
लंडन : १
फ्रान्स : १