CoronaVirus : गावाच्या मुख्य रस्त्यावरच प्रवेश बंदीचे फलक; संचारबंदीचे गांभिर्य ग्रामस्थांमध्येच अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 07:01 PM2020-04-07T19:01:23+5:302020-04-07T19:04:49+5:30
संचारबंदीच्या काळात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कामे नसतानाही शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळात नागरिक बिनधास्तपणे फिरत आहेत़
- ज्ञानेश्वर रोकडे
जिंतूर: कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदीसारखे कठोर निर्णय घेतले आहेत; परंतु, शहरात नियमांचे पालन करणा-यांपेक्षा नियम मोडणा-यांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे़ याउलट ग्रामीण भागात मात्र ग्रामस्थांकडून अधिक सतर्कता बाळगून गावात प्रवेश करणा-या मुख्य रस्त्यांवर बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदीचे फलक लावल्याचे तालुक्यात ठिक ठिकाणी दिसून येत आहे़ त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक सतर्कता बाळगली जात असल्याचे सोमवारी दिसून येत आहे.
राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे़ या काळामध्ये नागरिकांना काही नियम घालून दिले आहेत़ विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सचा वापर करावा आदी नियम घालून दिले आहेत़ असे असतानाही नागरिकांकडून मात्र या नियमांना बगल दिली जात आहे़
संचारबंदीच्या काळात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कामे नसतानाही शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळात नागरिक बिनधास्तपणे फिरत आहेत़ जिंतूर-औंढा रस्त्यावर औद्योगिक वसाहत, बलसा रस्ता या भागातही सकाळ, सायंकाळी वॉक करणे त्याचबरोबर भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडून सोशल डिस्टन्सच्या नियमाला बगल देणे आदी प्रकार शहरात सर्रास दिसून येत आहेत़
तर दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी अनेक उपाययोजना अंमलात आणत आहेत़
तालुक्यातमील बहुतांश गावांमध्ये ग्रामपंचायतीकडून सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून गावातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्ते निर्जंतूक राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ त्याचबरोबर बाहेरगावाहून आलेल्या ग्रामस्थांसोबत सोशल डिस्टन्सचा वापर करूनच व्यवहार केला जात आहे़ त्याचबरोबर तालुक्यातील काही गावांनी तर बाहेरच्या व्यक्तींना गावात प्रवेश देण्यास बंदी घातली आहे़ त्या संदर्भातील फलक गावात प्रवेश मुख्य रस्त्यांवर लावले आहेत़ त्याबरोबर सरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, आरोग्य कर्मचारी, जनजागृती करून, हात धुणे, स्वच्छता ठेवणे, विनाकारण घोळक्याने गप्पा मारू नये आदीबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत आहेत; परंतु, शहरात मात्र उलट परिस्थिती दिसून येत असल्याचे पहावयास मिळत आहे़
चामणीत गावबंदी फलक
जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बाहेरच्या नागरिकांना फलक दिला जात नाही़ विशेष म्हणजे गावातील नागरिकही गावाच्याबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे़ अशातच चामणी येथील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून गावात येणाºया मुख्य रस्त्यावर कोरोनामुळे बाहेरील व्यक्तीस गावात येण्यास बंदी असल्याचा बोर्ड ग्रामपंचायतीकडून लावण्यात आला आहे़ त्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक सतर्कता बाळगली जात असल्याचे दिसून येत आहे़
शहरात रात्री उशिरापर्यंत गप्पांचे फड
जिंतूर शहरातील हुतात्मा स्मारक, ग्रीन पार्क, शिवाजी नगर, आनंद नगर, लेक्चर कॉलनी, बलसा रस्ता, साई मंदिर या परिसरात जवळपास ५० टक्के नागरिक सुशिक्षित आहेत; परंतु, संचारबंदीच्या काळातही नेहमीप्रमाणेच गप्पागोष्टी करण्यासाठी दररोज रात्री उशिरापर्यंत घोळक्याने बसत असल्याचे रविवारी रात्री केलेल्या पाहणीत दिसून आले़