CoronaVirus : कौतुकास्पद ! आजारी वडीलांना भेटण्यास आलेल्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यास परभणीतून परत पाठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:33 PM2020-04-13T17:33:56+5:302020-04-13T17:51:05+5:30
परभणी जिल्ह्यातील सातोना चेक पोस्टवरील प्रकार
सेलू: आजारी असलेल्या वडीलांना भेटण्यासाठी मुंबई येथून सेलूत येत असलेल्या एका वरिष्ठ अधिका-यास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना आणि परभणी सीमेवर असलेल्या सातोना जिल्हा सीमेवरून पोलिसांनी परत पाठवले आहे. हा प्रकार रविवारी सातोना चेक पोस्टवर घडला.
सुञांनी दिलेल्या माहितीनुसार सेलू येथील विद्यानगर मधील रहिवासी तथा मुंबई येथील मंञालयातील शिक्षण विभागातील अव्वर सचिव संतोष गायकवाड यांच्या वडीलांची तब्येत प्रकृती बरी नसल्याने त्यांना सेलू येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वडील आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी गायकवाड हे मुंबईहून मोटारीने सेलू कडे निघाले. परभणी आणि जालना जिल्हा सीमेवरील सातोना चेक पोस्टवर त्यांची मोटार रविवारी राञी ७ वाजेच्या सुमारास आल्यानंतर चेक पोस्टवरील पथकाने विचारपूस केली. तसेच अधिक चौकशी केली. त्यानंतर तहसीलदार बालाजी शेवाळे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना या विषयी माहिती दिली. पंरतु, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार इतर जिल्हयातून एकही व्यक्ती येणार नाही. तसेच त्यांना परभणी जिल्ह्यात प्रवेश देऊ शकत नाही. असे सांगितल्यानंतर अव्वर सचिव संतोष गायकवाड यांना परत फिरावे लागले.
हाॅटस्पाॅट वरून आल्याने प्रवेश नाकारला
वरिष्ठ अधिकारी संतोष गायकवाड हे मुंबई येथून सेलूत येत होते. मुंबई शहरातील कोरोनाचे अधिक रूग्ण असलेल्या वरळी, वांद्रे येथे ते असतात. हा भाग कोरोना हाॅटस्पाॅट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तेथून आलेल्या व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश देण्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार गायकवाड यांना जिल्हयात प्रवेश दिला तर त्यांना क्वारंटाईन केले जाईल. आजारी वडीलांना उपचारासाठी त्यांना मुंबईला घेऊ जाता येते. असे पर्याय त्यांना देण्यात आले होते.
- बालाजी शेवाळे, तहसीलदार, सेलू